देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत १५ लाख प्रत्येकाच्या खात्यावर जमा करणार, वर्षाला दोन कोटी तरुणांना रोजगार देणार ही आश्वासने दिली होती. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषणात काही बोलत नसून यासह अनेक मुद्यापासून ते पळ काढत आहेत अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पंतप्रधानांवर सडकून टीका केली. मोदी साहेब आपण २०१४ आश्वासनांवर बोला त्याचे काय झाले. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

यावेळी आनंद शर्मा म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत मोठ मोठ्या घोषणा देऊन भाजप सत्तेमध्ये आली आहे. पण त्यांना या घोषणांचा विसर पडला असल्याने देशात विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. तरुणाच्या हाताला रोजगार नाही, विकास दर घटला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, शेतकरी वर्ग उध्वस्त झाला आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आमची सत्ता आल्यास आम्ही जे आश्वासन दिली आहे. ती आम्ही पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आम्ही जे बोलतो तेच करतो पण भाजप जे बोलते ते काही करत नाही अशा शब्दात भाजपच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, देशात झालेल्या २०१४ च्या निवडणुकीत देखील भाजपने महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण असणार अशी घोषणा त्यावेळी झालेल्या निवडणुकीत दिली. त्यावर मोदीनी पाच वर्षात कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली. आम्ही महिलांच्या आरक्षणाच्या बाजूने असताना देखील मोदी त्यावर शांत का होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुम्हाला लाज वाटू द्या अशा शब्दात ३३ टक्के संसदेत महिला आरक्षण असणार यावरून पंतप्रधानांना त्यांनी लक्ष केले.

पंतप्रधान बोलत आले आणि बोलत जाणार

देशात २०१४ साली झालेल्या निवडणुकीत देशभरात नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊन सत्ता हाती घेतली. तेव्हा पासून आज पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत आले आणि बोलत जातील अशा शब्दात शर्मा यांनी मोदींना टोला लगावला.

मोदीनी देशभक्ती आणि देशाची सुरक्षितता आम्हाला शिकवू नये
पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशसेवेसाठी बलिदान दिले आहे. या परिवाराने एवढे सहन करून देखील गांधी परिवाराने देशाच्या सेवेसाठी वाहून घेतले आहे. हे लक्षात घेता भाजपच्या कोणत्या नेत्याचे किंवा पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तिने देशाच्या सेवेसाठी बलिदान दिले आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगावे. त्यामुळे मोदीनी देशभक्ती आणि देशाची सुरक्षितता आम्हाला शिकवू नये अशी भूमिका आनंद शर्मा यांनी मांडली.