काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होणार यात काही शंका नाही. कारण लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा बाकी असताना मोदींना नीच म्हणणे योग्यच होते असं म्हणत अय्यर यांनी जुन्या वादाला तोंड फोडलं आहे. मणिशंकर अय्यर यांनी २०१७ मध्ये एक लेख लिहिला होता. या लेखात मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख नीच माणूस असा केला होता. त्या वक्तव्यावर आपण ठाम आहोत असे मणिशंकर अय्यर यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये एकीकडे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींना उल्लेख दुर्योधन असाही केला आहे. तर सॅम पित्रोडा यांनी १९८४ च्या दंगलीबाबत जे वक्तव्य केलं त्यावरूनही भाजपाने टीकेचे ताशेरे झाडले आहेत. अशात मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा आपण मोदींना नीच म्हटलं होतं आणि त्या वक्तव्यावर आपण अजूनही ठाम आहोत असं म्हटलं आहे. २०१७ मधल्या लेखात मी नरेंद्र मोदींना नीच म्हटलं होतं. माझी भविष्यवाणी खरी ठरली की नाही असाही प्रश्न अय्यर यांनी विचारला आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीतल्या या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा वाद उफाळणार यात शंका नाही.

काँग्रेस नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यं केली जात आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात काँग्रेसला ४० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत त्या मिळाल्या तर नरेंद्र मोदी चौकात गळफास लावून घेतील का? असा प्रश्न खरगे यांनी विचारला आहे. यावरून खरगे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. हे सगळे वाद कमी होते की काय? म्हणूनच आता मणिशंकर अय्यर यांनी मोदींना नीच म्हणणं योग्य होतं म्हणत नव्या वादाची फोडणी दिली आहे.