१२ लोकसभा मतदारसंघांत लाखाच्यावर मते

मुंबई : लोकसभा निवडणुकीत धुळधाण झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसपुढे भाजप-शिवेसनेबरोबरच वंचित बहुजन आघाडीचे आणखी एक आव्हान उभे राहिले आहे. राज्यातील ४८ मतदारसंघातील वंचित आघाडीच्या उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांचा आकडा ४० लाखांच्या जवळपास गेला आहे. त्यापैकी १२ मतदारसंघात वंचित आघाडीच्या उमेदवारांना एक ते तीन लाखापर्यंत मते मिळाली आहेत. औरंगाबाद मतदारसंघात आघाडी पुरस्कृत एमआयएमने आश्चर्यकारकरित्या विजय मिळविला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वंचित आघाडी मोठे डोकेदुखी ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी साधारणत: सहा महिने आधी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली होती. या राज्यात प्रस्थापित पक्षांमधील काही ठरावीकच घराण्यांचे सत्तेच्या राजकारणात वर्चस्व आहे. त्याची आकडेवारी मांडून आंबेडकर यांनी सत्तेपासून वंचित असलेल्या समाज घटकांना संघटित करण्याचा प्रयत्न केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. वंचित आघाडीची स्थापना करून त्यांनी राज्यभर घेतल्या सभांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. काँग्रेसबरोबर युतीची बोलणी झाली, परंतु जागावाटप व अन्य काही मुद्दय़ांवर समझोता होऊ शकला नाही. त्यामुळे आंबेडकर यांनी आघाडीला स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरवले.

वंचित आघाडीने वेगवेगळ्या समाज घटकातील कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली होती. प्रकाश आंबेडकर स्वत सोलापूर व अकोला या दोन मतदारसंघातून निवडणूक लढले, तरीही त्यांनी अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी संबंध महाराष्ट्र पिंजून काढला. निवडणूक निकालात त्याचे परिणाम दिसले. वंचित आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही, परंतु आघाडीचा मित्र पक्ष असलेला एमआयएमचे इम्तियाज जलील औरंगाबादमधून विजय झाले. हा विजय दलित, आदिवासी, बलुतेदार, ओबीसी, मुस्लिम समाजाला एकत्र करण्याच्या आंबेडकरांच्या रणनीतीचाच मानला जातो. त्याशिवाय आघाडीच्या उमेदवारांना जवळपास ४० लाखांच्या जवळपास मते मिळाली आहेत. त्यापैकी १२ मतदारसंघात एक लाख, दीड लाख, पावणे दोन लाख, अडीच लाख ते तीन लाखांपर्यंत मते मिळाली आहेत.

वंचित आघाडीमुळे भाजप-शिवसेनाविरोधी मतांचे मोठय़ा प्रमाणावर विभाजन होऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा मोठा फटका बसला. नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सोलापूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, बुलढाण्यात राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे, हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, सांगलीत विशाल पाटील, तसेच परभणीत राष्ट्रवादीचे उमेदवार व हिंगोली आणि गडचिरोली-चिमूरमध्ये काँग्रेस उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का आहे. विधानसभा निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. वंचित आघाडीने घेतलेल्या मतांची संख्या पाहता, आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला युतीबरोबर आघाडीच्या आव्हानाचाही सामना करावा लागणार आहे.

लाखांच्या वर मते मिळालेले मतदारसंघ

’ सांगली-३००२३४

’ अकोला-२७८८४८

’ बुलढाणा-१७२६२७

’ चंद्रपूर-११२०७९

’ गडचिरोली-१११४६८

’ हातकणंगले-१२३४१९

’ हिंगोली-१७४०५१

’ लातूर-११२२५५

’ नांदेड-१६६१९६

’ नाशिक-१०९९८१

’ परभणी-१४९९४६

’ सोलापूर-१७०००७