राजीनाम्याचा प्रस्ताव कार्यकारिणीने फेटाळला

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या नामुष्कीजनक पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेला राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणीने शनिवारी अपेक्षेप्रमाणे एकमताने फेटाळला. काँग्रेसला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे कार्यकारिणीतील सदस्यांचे मत आहे. त्यामुळे या सदस्यांनी राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाची पुनर्रचना करण्यास सांगितले असून तसा ठरावही बैठकीत संमत करण्यात आला.

निकालाच्या दिवशी गुरुवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी आपलीच असल्याचे स्पष्ट केले होते. पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत मात्र राहुल यांनी ‘हा प्रश्न मी आणि कार्यकारिणी यांच्यातील आहे,’ असे विधान केले होते. त्यामुळे राहुल गांधी शनिवारी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवतील असे मानले जात होते.

कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राहुल यांनी पत्रकारांशी संवाद साधणे अपेक्षित होते मात्र, काहीही न बोलता राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयातून निघून गेले. सातत्याने काँग्रेसला हार पत्करावी लागत असल्यानेच राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे ठरवले होते. राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळल्यानंतरही राहुल यांनी कार्यकारिणीने फेरविचार करण्यास सांगितल्याचे समजते. राहुल यांचा प्रस्ताव स्वीकारला तर पक्षाचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे ही मोठी अडचण काँग्रेससमोर आहे.

या बैठकीला यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, मनमोहन सिंग यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांनी दीड वर्षांपूर्वी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर झालेल्या अनेक निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात एक जागा मिळाली. कर्नाटकमध्येही जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाशी आघाडी करूनही यश मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. १९ राज्यांमध्ये काँग्रेसने भोपळाही फोडलेला नाही. इतकेच नव्हे तर पारंपरिक अमेठी मतदारसंघही राहुल गांधींना राखता आला नाही.

वैचारिक लढाई सुरूच..

लोकसभा निवडणुकीत जनमताचा कौल काँग्रेसच्या विरोधात गेला असला तरी वैचारिक लढाई लढावीच लागणार आहे. तरुण, शेतकरी, दलित-आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्य समाजाचे प्रश्न ऐरणीवर आणावे लागतील. त्यासाठी काँग्रेसला मजबूत करावे लागणार असून पक्ष संघटनेच्या पुनर्रचनेची गरज आहे. हे काम राहुल गांधी यांनी तातडीने हाती घ्यावे, असा ठराव कार्यकारिणीत संमत करण्यात आल्याची माहिती पक्ष प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.

ममता यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळला

कोलकाता लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल काँग्रेस पक्षाची खराब कामगिरी झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली, मात्र पक्षाने ती फेटाळली. पश्चिम बंगालमध्ये भाजपने धर्माच्या नावावर लोकांचे ध्रुवीकरण केले, असा आरोप बॅनर्जी यांनी निवडणुकीनंतरच्या आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत केला.