लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक असून याच पार्श्वभुमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे. पुढील २४ तास महत्त्वाचे असून सतर्क राहा असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘प्रिय कार्यकर्त्यांनो, पुढील २४ तास महत्त्वाचे आहेत, सतर्क राहा. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. खोट्या एक्झिट पोलच्या चुकीच्या प्रचाराने निराश होऊ नका. स्वत:वर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा. तुमची मेहनत वाया जाणार नाही’.

मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपप्रणीत ‘एनडीए’ला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर, मतदान यंत्रांमध्ये गडबड झाल्याच्या कथित मुद्दय़ावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. मतमोजणीतील पारदर्शक प्रक्रियेसाठी मतपावत्यांची (व्हीव्हीपॅट) मतमोजणी सर्वात आधी केली जावी, त्यानंतरच उर्वरित यंत्रांमधील मतांची मोजणी व्हावी, अशी मागणी विरोधकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत बुधवारी निर्णय घेतला जाईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

अधिकृत निवडणूक निकालाला मध्यरात्र होणार?
निवडणूक आयोगाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ ते १८ तास लागणार असल्याने लोकसभा निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर होण्यास मध्यरात्र किंवा त्याही पेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उशिरापर्यंत जाहीर निकालाच्या कलावरूनच कोण जिंकणार, याबाबत अंदाज बांधावा लागणार आहे. दरम्यान, होणारा विलंब कमी करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात असल्याचा दावा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे.