राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीमध्ये एक बैठक झाली. या बैठकीत हे दोन नेते सुमारे ५० मिनिटे बंद दाराआड चर्चा करत होते. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? या आणि अशा विविध चर्चांना उधाण आलं आहे. दिल्लीत कालपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष विलीन होणार अशी चर्चा रंगली होती. त्यातच आज या दोन नेत्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात विलीनीकरणाच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र राहुल गांधी यांनी शरद पवारांची घेतलेली भेट ही विलीनीकरणाची चर्चा करण्यासाठी नाही तर त्यांचा सल्ला घेण्यासाठी घेतली होती असे समजते आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या पराभवानंतर राहुल गांधी हे प्रचंड निराश झाले आहेत. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमधल्या
दिग्गजांचा सल्ला घेतला आता आज त्यांनी शरद पवार यांचा सल्ला घेऊन त्यांच्यासोबत पराभवासंदर्भात चर्चा केली. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये असं परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. या दोन नेत्यांमध्ये सुमारे ५० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. मात्र चर्चा लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर झाली असंही शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवार यांनी राहुल गांधी यांना नेमका काय सल्ला दिला हे समजू शकलेलं नाही. मात्र या बैठकीत विलीनकरणावर चर्चा झाली नाही असे आता सूत्रांकडून समजते आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार का? अशा चर्चा रंगल्या. मात्र या दोघांमध्ये पराभवाबाबत चर्चा झाल्याचे समजते आहे. इतकंच नाही तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसल्याचं म्हटलं आहे. तसंच राहुल गांधी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.