राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या वातावरणात मी आवेशात विधान केले होते आणि विरोधकांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राफेल विमाने खरेदीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेसोबत संरक्षण मंत्रालयातून फुटलेली गोपनीय कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे फेरविचार याचिका फेटाळण्याची केंद्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून ही कागदपत्रे ग्राह्य धरली. त्यानंतर राहुल गांधी यांनी या प्रकरणी ‘चौकीदार चोर है’, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आपल्या निर्णयात ‘चौकीदार चोर है’ असे कुठेही म्हटलेले नसल्याचे नमूद करत न्यायालयाने अवमान याचिकेवर राहुल यांना नोटीस बजावली. या प्रकरणी भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. या नोटीशीवर राहुल गांधी यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली.

मी निवडणुकीच्या वातावरणात आवेशात विधान केले होते आणि माझ्या राजकीय विरोधकांनी त्या विधानाचा विपर्यास करत गैरसमज पसरवले. राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टाने चौकीदार चोर है, असे विधान केल्याचे विरोधकांनी पसरवले होते. मी असा विचार कधी केलाही नव्हता, असे त्यांनी सांगितले. कोर्टाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा माझा हेतू नव्हता, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले.