लोकसभा निवडणुकीसाठी २१ उमेदवारांची काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातून पाच जागांवरील उमेदवार या दुसऱ्या यादीतून जाहीर करण्यात आले आहेत. तर उर्वरित सर्व १६ जागा या उत्तर प्रदेशातील आहेत. यामध्ये नाना पटोले यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भाजपासोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या साध्वी सावित्रीबाई फुले यांना उत्तर प्रदेशातील बहारिच येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये नागपूरमधून नाना पटोले, सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, मुंबई उत्तर-मध्यमधून प्रिया दत्त, मुंबई साऊथमधून मिलींद देवरा, गडचिरोली-चिमुर येथून डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

तर, उर्वरित १६ जागा या उत्तर प्रदेशातील असून यामध्ये नगिना येथून ओमवती देवी जटाव, मोरादाबाद येथून राज बब्बर, खेरीतून जाफर अली नक्वी, सितापूरमधून कैसर जहाँ, मिसरिख येथून मंजरी राही, मोहनलाल गंज येथून रामशंकर भार्गव, सुल्तानपूर येथून डॉ. संजय सिंह, प्रतापगढ येथून रत्ना सिंह, कानपूरमधून श्रीप्रकाश जैस्वाल, फतेहपूर येथून राकेश सचन, बहारिचमधून साध्वी सावित्रीबाई फुले, संत कबीर नगर येथून परवेझ खान, बंसगाव येथून कुश सौरभ, लालगंजमधून पंकज मोहन सोनकर, मिर्झापूर येथून ललितेश त्रिपाठी आणि रॉबर्ट्सगंज येथून भगवती प्रसाद चौधरी या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

या दुसऱ्या यादीत खुल्या प्रवर्गातील १२ उमेदवार आहेत. तर अनुसुचित जाती प्रवर्गातील ८ उमेदवार आहेत तर १ उमेदवार अनुसुचीत जमाती प्रवर्गातील आहे.