16 October 2019

News Flash

अखेर शीला दीक्षित निवडणुकीच्या मैदानात

भाजपचे खासदार मनोज तिवारी यांच्याशी संघर्ष करावा लागणार आहे.

काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या आघाडीला कडाडून विरोध करणाऱ्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित अखेर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. काँग्रेसने त्यांना दिल्लीतील उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली असून त्यांना भाजपचे खासदार मनोज तिवारी यांच्याशी संघर्ष करावा लागणार आहे.

शीला दीक्षित यांना चाँदनी चौक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. या मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री कपिल सिबल निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. दीक्षित यांना दिल्ली-पूर्व मतदारसंघ दिल्यानंतरही चाँदनी चौकातून सिबल यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. सिबल राज्यसभेचे खासदार असून वरिष्ठ सभागृहातील विद्यमान सदस्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट न देण्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे धोरण असल्याने सिबल यांना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली असल्याचे मानले जाते. दिल्लीतील सात मतदारसंघांपैकी काँग्रेसने सहा उमेदवारांची घोषणा केली आहे. चाँदनी चौकातून जे. पी. अगरवाल तर, नवी दिल्ली मतदारसंघातून अजय माखन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने दक्षिण दिल्लीचा उमेदवार निश्चित केलेला नाही.

युतीची शक्यता संपुष्टात

शीला दीक्षित यांच्या उमेदवारीमुळे दिल्लीत काँग्रेस आणि आपच्या युतीची शक्यता संपुष्टात आली आहे. दिल्लीच्या जोडीला हरियाणा आणि पंजाबमध्येही आघाडी करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने नाकारल्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लोकसभेची निवडणूक लढवतील. मंगळवार (२३ एप्रिल) हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून सहा टप्प्यांत म्हणजे १२ मे रोजी दिल्लीत मतदान होणार आहे. ‘आप’ने यापूर्वीच सात उमेदवार जाहीर केले आहेत.

First Published on April 23, 2019 2:06 am

Web Title: congress releases candidates list for six delhi ls seats sheila dikshit to contest