लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) फक्त ८६ मते मिळाली आहेत. तर अन्य पक्षांना १०६ जागा मिळाल्या आहेत. सलग दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या.  यंदा हा पक्ष ५२ जागांवर जिंकला असला असून त्यांची स्थिती किंचित सुधारली आहे. पण काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत तब्बल १७ राज्यांमध्ये भोपळाही फोडता आलेला नाही. यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, मणिपूर, मिझोराम, ओदिशा, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड, अंदमान आणि निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, दमण दिव आणि लक्षद्वीप या ठिकाणी काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही.

भाजपाने देशभरात विजयी घौडदौड कायम ठेवली असली तरी आंध्र प्रदेशमध्ये भाजपाला एक टक्काही मते मिळालेली नाहीत. केरळ, आंध्र प्रदेश, तामिळ नाडू आणि पुद्दूचेरीत या चार राज्यांमध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आलेली नाही.

१३ राज्यांमध्ये भाजपाला ५० टक्क्यांहून अधिक मते

भाजपाला उत्तर प्रदेशात ५० टक्क्यांच्या आसपास मते मिळाली आहेत, तर हरयाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, उत्तराखंड, गुजरात, झारखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक, दिल्ली, चंडीगड व अरुणाचलमध्ये भाजपाने पन्नास टक्क्यांहून अधिक मते प्राप्त केली आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपला ४० टक्क्यांच्या जवळपास मते मिळाली आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये ४६ टक्के मते मिळाली आहेत, तेलंगणमध्ये २० टक्के तर केरळमध्ये १३ टक्के तर ओडिशात ३८ टक्के मिळाली आहेत. फक्त आंध्रमध्ये भाजपाला एक टक्काही मते मिळवता आली नाहीत. महाराष्ट्रात युती निवडणूक लढविलेल्या भाजपाला २७ टक्के तर पंजाबमध्ये १० टक्के, ३५ टक्के आसाममध्ये, २४ टक्के मते बिहारमध्ये मिळाली आहेत. काँग्रेसला उत्तर प्रदेशात केवळ सहा टक्के मते मिळाली आहेत. बिहारमध्ये सात टक्के मते प्राप्त झाली. पंजाबमध्ये ४० टक्के मते मिळवता आली.