भिवंडीतील उमेदवार सुरेश टावरे यांनी सदिच्छा भेट घेतल्याने चर्चेला उधाण

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकविल्यामुळे शिवसेनेतून निलंबित झालेले सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी आता काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हात्रे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, काँग्रेस पक्षाच्या प्रचारासंबंधी दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.

माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनीही म्हात्रे यांच्याशी संपर्क साधून नाराज शिवसैनिकांची मोट टावरे यांच्या बाजूने बांधावी यासाठी त्यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे यांनी दंड थोपटले होते. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आले. परंतु, म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यावेळी त्यांनी कपिल पाटील यांना पाठिंबा जाहीर न केल्याने ते काँग्रेससाठी काम करणार, अशी चर्चा सुरू झाली होती.

शिवसेनेतील या नाराजीचा फायदा उचलण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी दोन दिवसांपूर्वी गुंदवली गावातील म्हात्रे यांचे निवासस्थान गाठले आणि त्याठिकाणी म्हात्रे यांची  सदिच्छा भेट घेऊन त्यांच्यासोबत निवडणुकीसंबंधी चर्चा केली. या चर्चेदरम्यान टावरे यांनी काँग्रेसला पाठिंबा देऊन प्रचार करण्यासंबंधी प्रस्ताव म्हात्रे यांच्यापुढे ठेवला. मात्र, त्यावर म्हात्रे यांनी कोणतीच भूमिका स्पष्ट केली नसल्याचे समजते. ‘म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्यासंदर्भात त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला. मात्र, त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही,’ अशी प्रतिक्रिया टावरे यांनी दिली. तर, वारंवार प्रयत्न करूनही म्हात्रे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

प्रचारापासून फारकत

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन युतीचे उमेदवार कपिल पाटील यांचा प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकांनाही सुरेश म्हात्रे उपस्थित नव्हते. तसेच कपिल पाटील यांच्या प्रचार रॅलीला म्हात्रे उपस्थित नव्हते. दरम्यान, म्हात्रे यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्यामुळे ते बैठका तसेच प्रचाराला उपस्थित राहत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या संदर्भात शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, या विषयावर नंतर बोलू असे सांगून त्यांनी बोलणे टाळले.