आसाममधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कामरुप येथे प्रचारसभा घेतली. या सभेमध्ये भाषणादरम्यान शाह यांनी काँग्रेसवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप करत हल्लाबोल केला. काँग्रेस लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या, ‘सबका साथ सबक का विकास’ या घोषणेची आठवण करुन दिलीय.

“काँग्रेसला लोकांमध्ये बोडो आणि इतर, आसामी-बंगाली, हिंदू-मुस्लीम, वरील आसाम-खालील आसाम, आदिवासी-बिगरआदीवासी अशी फूट पाडू पाहत आहे. नरेंद्र मोदींची घोषणा मात्र ‘सबका साथ सबका विकास’ अशी आहे,” असं शाह यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितलं.

पुढे बोलताना शाह यांनी भाजपा सत्तेत आल्यानंतर राज्याचा सर्वसमावेशक विकास करण्यास प्राधान्य देईल असं सांगितलं. तसेच अल्पसंख्यांसहीत सर्वांना समान सोयी उपलब्ध करुन दिल्या जातील अशा शब्दही शाह यांनी दिला. “आम्ही जेव्हा घरोघरी पाणी पुरवू तेव्हा प्रत्येक घरात पाणी पुरवलं जाईल. यामध्ये मुस्लिमांच्या घरांचाही समावेश असेल. आम्ही जेव्हा सर्वांना घरं देऊ तेव्हा त्यामध्ये अल्पसंख्यांक सामाजातील लोकांचाही समावेश असेल. अल्पसंख्यांक, आदिवासी, बोडो या सर्वांना १० हजार रुपयांची मदत केली जाईल. शेतकऱ्यांनाही आसाम सरकार मदत करेल,” असंही आमित शाह यांनी सांगितलं.

असं होणार मतदान…

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमधील मतदानाला २७ मार्चपासून सुरुवात झाली आहे. तर आसाममध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान २७ मार्च पार पडलं. पश्चिम बंगालमधील मतदान हे जवळजवळ एक महिना सुरु राहणार असून आठव्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. पश्चिम बंगालबरोबरच आसाम, केरळ आणि तामिळनाडूबरोबरच पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकींचे निकाल २ मे रोजी लागणार आहेत. पाचही राज्यांमधील एकूण ८२४ जागांसाठी मतदान होणार आहेत. यामध्ये २.७ लाख मतदानकेंद्रांमध्ये १८ कोटी ६० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजवतील. यापैकी पश्चिम बंगालमध्येच एक लाखांहून अधिक मतदान केंद्र आहेत. या सर्व राज्यांपैकी बंगालची सर्वाधिक चर्चा आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा भाजपाने थेट आव्हान दिलं असून राज्यात सत्ता मिळवण्याचा भाजपाने सर्व जोर लावण्याची तयारी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: बंगालमधील निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उतरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेक नेत्यांसहीत भाजपाने येथे सारा जोर लावलाय. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी एकट्या तृणमूलसाठी प्रचार करत आहेत.