लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक शनिवारी सकाळी पार पडली. या बैठकीत राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, समितीमधील नेत्यांनी एकमताने राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. कार्यकारिणीने पक्षात बदल करण्याचे सर्वाधिकार राहुल गांधींनाच दिले असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी बैठकीनंतर सांगितले.

लोकसभा निवडणुकीत ५४२ पैकी काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या आहेत.  राहुल गांधी यांनी वायनाडमधून दणदणीत विजय मिळवला असला तरी परंपरागत अमेठी मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. या वेळी लोकसभा निवडणुकीत १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या पक्षसंघटनेची वाताहत झालेली आहे. सहा महिन्यांपूर्वी छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन झाली असली तरी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पक्षाला काठावर बहुमत मिळालेले आहे. उत्तर प्रदेशच्या २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पराभव पत्करावा लागला होता.

या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी दिल्लीत काँग्रेसच्या कार्य़कारिणी समितीची बैठक पार पडली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी- वढेरा आणि काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित होते. मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री कमलनाथ हे बैठकीत अनुपस्थित होेते. यामुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. बैठकीत लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दर्शवली. मात्र, कार्यकारिणीने त्यांचा प्रस्ताव एकमताने फेटाळून लावला.

कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा करताना राजीनाम्याची तयारी दाखवली. यानंतर प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांसमोर राजीनाम्याची तयारी दर्शवली. मात्र, दोघांनीही राहुल गांधी यांना राजीनामा देऊ नये, असा सल्ला दिला. तुम्ही राजीनामा देण्याची गरज नाही, निवडणुकीत जय- पराजय होत राहतो, असे मनमोहन सिंग यांनी राहुल गांधी यांना सांगितले.

या चर्चेची कुणकुण काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीमधील सदस्यांना लागली होती. बैठक सुरु होताच कार्यकारिणीमधील सदस्यांनी राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये असे सांगितले. राहुल गांधी यांनी प्रस्ताव सादर करण्यापूर्वीच कार्यकारिणीने त्यांच्या राजीनाम्याला विरोध दर्शवला होता.

कार्यकारिणीची बैठक तब्बल तीन तास सुरू होती. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी हे बैठकीतून बाहेर पडले. यानंतर पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला, गुलाम नवी आझाद, ए के अँटनी यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीबाबत माहिती दिली.