‘आम्हाला २० रुपये भाव देतात आणि विकत घ्यायला गेलं की तेच दूध पिशवीत पॅकिंग करुन ३० रुपये मोजून घ्यावं लागतं’

शिवराज यादव, माढा

माढा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी उभ्या असून दूधाला मिळणारा कमी भाव आणि न मिळणारं अनुदान चिंतेचा विषय ठरत आहे. दुधाला प्रति लिटर फक्त १८ ते २० रुपये भाव दिला जात आहे. याशिवाय सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं पाच रुपयांचं अनुदान अद्यापही प्रलंबित आहे. यामुळे दुधाचा भाव मिनरल वाॅटरच्या बाटलीपेक्षाही कमी असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

माढा तालुक्यातून रोज जवळपास ६० हजार लिटर दूध संकलित होते. या दूधाला १८ ते २० रुपये लिटर या दराने भाव मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात हे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलंच नाही. त्यातच दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने वैरणीचे भाव वाढले आहेत. एका जनावराला दिवसाला कडब्याच्या १० पेंड्या जरी दिल्या तरी त्यासाठी ३०० रुपये मोजावे लागतात. त्यातून जास्तीत जास्त १० लिटर दूध मिळू शकतं. याचाच अर्थ दुधाचे त्या शेतकऱ्याला २० रुपये प्रमाणे २०० रुपये मिळतात. म्हणजे प्रत्यक्षात वैरणीचा खर्च ३०० रुपये होतोय आणि त्यात पोषण आहाराचे १०० रुपये होतात. यानुसार शेतकऱ्याला दिवसामागे २०० रुपये तोटा होत असून तो सहन न करण्यापलीकडचा आहे.

माढा तालुक्यात जवळपास सात हजारापेक्षा जनावरं आहेत. पण आजपर्यंत एकही चारा छावणी या ठिकाणी उभी राहिलेली नाही. नोव्हेंबरपर्यंत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. सगळी आणेवारी ५० पैशापेक्षा आत आहे. यामुळे सर्व जबाबदारी सरकारवर आहे. दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करुन सरकारने ती स्विकारलीदेखील आहे. पण असं असूनही अद्याप शेतकऱ्याला दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. कोणतंही धोरण सरकारने आखलं नाही आणि याचा फटका सरकारला बसू शकतो अशी शक्यता येथे वर्तवली जात आहे. हा कळीचा प्रश्न असून याशिवाय कांदा, गहू, ज्वारी आणि इतर शेतमालालाही भाव मिळत नसून याचा थेट परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना २० रुपये भाव, पण बाजारात विक्री ३० रुपयांनी
माढ्यातील शेतकरी समाधान खारे यांचं संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी पुण्यातील नोकरी सोडून शेतीवर लक्ष केंद्रीत केलं. पण शेतमालाला आणि खास करुन दुधाला भाव मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘सध्या थोडी फार पाण्याची टंचाई भासू लागली आहे. जनावरांना पाणी नाही. दिवसभर वैरण पाणी करुनही दुधाला फक्त २० रुपये मिळतात. सरकारचं अनुदानही मिळालेलं नाही. सध्या वैरण, सरकी यांचा खर्च वजा करता काहीच परवडत नाही. आम्ही दूधविक्रेते असूनही दुकानात दूध विकत घ्यायला गेलो की आमचंच दूध पिशवीत पॅक करुन ३० रुपयांना विकत घ्यावी लागते. शेतकऱ्याचा मालाला काहीच भाव मिळत नसून शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आमचं अनुदान मिळावं एवढी सरकारकडे विनंती आहे’, असं त्यांनी म्हटलं आहे.