यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. आज इथे सातव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे, मात्र आजही येथे ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना पहायला मिळाल्या. यापार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांनी तृणमुल काँग्रेसवर टीका केली असून मतमोजणीपर्यंत तृणमुलच्या कार्यकर्त्यांकडून इथे नरसंहार घडवून आणला जाईल, त्यामुळे इथे २३ मे पर्यंत केंद्रीय सुरक्षा दलाला तैनात करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.


सितारामण म्हणाल्या, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुरुवातीपासून धमकी देत आल्या आहेत. त्यामुळे आम्हाला भीती वाटते की, आज एकीकडे मतदान संपल्यानंतर तृणमुल काँग्रेसकडून दुसरीकडे नरसंहार सुरु होईल. त्यामुळेच आमची मागणी आहे की, बंगालमध्ये आदर्श आचारसंहिता संपेपर्यंत केंद्रिय सुरक्षा दलाला तैनात करण्यात यावे.

दरम्यान, रविवारी शेवटच्या ७ व्या टप्प्यातील मतदानादरम्यान मतदान केंद्रावर तृणमुलच्या महिला कार्यकर्त्यांसोबत वाद झाल्यानंतर भाजपाचे अनुपम हाजरा यांनी तृणमुलच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार निलांजन रॉय यांची गाडीही फोडण्यात आली.

हाजरा यांनी आरोप केला की, जाधवपूर लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्र १५० आणि १३७ येथे तृणमुलची एक महिला कार्यकर्ता आपला चेहरा झाकून बोगस मतदान करीत होती. यावर मी आक्षेप घेतला तर संबंधीत महिलेने मतदान केंद्रावर गोंधळ घातला.