20 October 2019

News Flash

दिल्लीत भाजपाला हादरा, उमेदवारी न मिळाल्याने विद्यमान खासदार काँग्रेसमध्ये

फक्त दलित असल्याने तुम्ही दलित नेते ठरत नाही, तुम्हाला दलित समाजाच्या हितासाठी लढावं लागतं, असे त्यांनी म्हटले आहे.

बुधवारी सकाळी उदित राज यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजपाने दिल्लीतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून गायक हंसराज यांना उमेदवारी दिल्याने विद्यमान खासदार उदित राज नाराज झाले असून त्यांनी बुधवारी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दलितांसाठी आवाज उठवणे चुकीचे आहे का, असा प्रश्नही उदित राज यांनी विचारला आहे. उदित राज हे दलित समाजातील नेते असून काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी देखील उदित राज यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले आहे.

उदित राज यांनी मंगळवारी भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत दिले होते. उदित राज हे दिल्लीतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपाने उदित राज यांना डावलून गायक हंसराज यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने मला तिकीट नाकारुन अन्याय केला आहे. मी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार नाही. पण भाजपाने मला पक्ष सोडण्यासाठी भाग पाडले असून मी अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी मंगळवारी म्हटले होते.  अखेर बुधवारी सकाळी उदित राज यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर उदित राज म्हणाले, भाजपानेच मला पक्ष सोडण्यास भाग पाडले. २०१८ मध्ये अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांविरोधात दलित समाजाने बंदची हाक दिली होती. मी देखील या बदलांनाविरोध केला होता. यामुळेच पक्षातील वरिष्ठ नेते माझ्यावर नाराज झाले असावेत. मी मुद्दे उपस्थित करायला नको का?, मी यापुढेही दलित समाजाच्या हितासाठी आवाज उठवतच राहणार, असे त्यांनी सांगितले. फक्त दलित असल्याने तुम्ही दलित नेते ठरत नाही, तुम्हाला दलित समाजाच्या हितासाठी लढावं लागतं, असे त्यांनी म्हटले आहे.

 

First Published on April 24, 2019 12:59 pm

Web Title: delhi bjp mp dr udit raj joins congress slams government over dalit issues