एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध धार्मिक संस्था दारुल उलूम देवबंदच्या मुफ्तीने २३ मे रोजी अनुकूल निकालासाठी देशभरातील मुस्लिमांना विशेष प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. सातव्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर रविवारी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर झाला.

एक्झिट पोलच्या अंदाजाने निराश झालेल्या मुफ्ती मेहमूद हसन बुलंदशहरी यांनी सध्याच्या परिस्थितीत मुस्लिम, मशिदीच्या सुरक्षिततेसाठी तसेच शांतता आणि समृद्धतेसाठी प्रार्थना करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. कोणाच्या प्रार्थन कबूल होतील हे तुम्ही सांगू शकत नाही. पण देशाची चांगल्या दिशेने वाटचाल सुरु होईल.

निवडणुकीचे निकाल जाहीर होईपर्यंत मी सर्व मशिदींना नियमित नमाज अदा केल्यानंतर विशेष प्रार्थना करण्याचे आवाहन करतो. तीन दिवस आधी ही प्रार्थन सुरु झाली पाहिजे असे मुफ्ती मेहमूद हसन बुलंदशहरी म्हणाले. देवबंद शहरातील अन्य मौलवींनी या आवाहनाचे स्वागत करताना सल्ल्याचे आचारण करण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही या सल्ल्याचे स्वागत करतो. सर्व मुस्लिमांनी धार्मिकतेने याचे पालन करावे. निवडणूक निकालाची आम्हाला चिंता आहे असे मौलाना इशाक गोरा म्हणाले. आपल्या देशाला सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या सरकारची गरज आहे. त्यामुळे मुफ्तींचा सल्ला गांभीर्याने घ्यावा असे इशाक गोरा म्हणाले.