देवेंद्र फडणवीस यांचा विनायक मेटेंना इशारा

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय भारतीय जनता पार्टी पूर्ण होत नाही. त्यामुळे सोबत रहायचे असेल तर मुंडेंसोबत राहा अन्यथा गरज नाही. कोणी राज्यात भाजपबरोबर आणि जिल्ह्यत वेगळी भूमिका घेत असेल तर अशांनी आमच्यासोबत राहू नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांना आज जोरदार फटकारले.

गोपीनाथ मुंडेंचा वारसा मुंडे भगिनी समर्थपणे चालवत आहेत.  त्यांचे नाव लावण्याचा अधिकार बेईमानी केली नाही त्या सर्वाना आहे, अशा शब्दात मुंडेंचे नाव लावण्यावर आक्षेप घेणाऱ्यांनाही मुख्यमंत्र्यांनी फटकारले. पक्ष मुंडे भगिनींसोबत खंबीरपणे असून डॉ. प्रीतम मुंडे  यांना पुन्हा एकदा विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. मुंडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी रात्री अंबाजोगाई येथे फडणवीस यांची सभा झाली. या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर, रमेश आडसकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार विनायक मेटे यांनी राज्यात भाजपबरोबर आणि बीडमध्ये राष्ट्रवादीला पािठबा अशी भूमिका घेतली होती. यावर बोलताना मेटे यांचे नाव घेण्याचे टाळून फडणवीस म्हणाले,की  दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय भारतीय जनता पार्टी पूर्ण होऊ शकत नाही. मात्र कोणी राज्यात भाजपबरोबर आणि जिल्ह्यत विरोधात भूमिका घेत असेल तर अशांनी आमच्याबरोबर राहू नये. सोबत रहायचे असेल तर मुंडेंबरोबर अन्यथा गरज नाही. चार वर्षांत मुंडे भगिनींनी मोठय़ा प्रमाणात निधी खेचून आणला आहे. आघाडीच्या पंधरा वर्षांत जिल्ह्यला ४०० कोटी रुपये मिळाले,तर भाजपच्या काळात तीन हजार ७०० कोटी रुपये मिळाले आहेत, असा दावा करून विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे निवडणूक जातीवर आणली जात असल्याचे ते म्हणाले.

सत्ता असताना आरक्षण का दिले नाही

जातीमुळे कोणी नेता होत नसतो. जातीसाठी कोण काय करतो, यावर नेता ठरतो असे सांगत ५० वर्षांत मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिला, तो आम्ही सोडवला. मग राज्यात १५ वर्ष सत्ता असताना का सोडवला नाही, असा थेट प्रश्नही त्यांनी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकीय हवेचा अंदाज येत असल्याने निवडणुकीतून माघार घेतल्याचा टोलाही त्यांनी लगावला.