मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे भाषण आणि काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे काल्पनिक कथात्मक मनोरंजन आहे. त्याचा वास्तवाशी संबंध नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत केलेल्या कामामुळे काँग्रेसची झोप उडाली आहे. जवानांच्या कामगिरीवर ते शंका घेत आहेत. देशद्रोहासारखा कायदा हटविण्याची भाषा ते करतात. सुरक्षेच्या प्रश्नाशी खेळ खेळत आहेत. ५० वर्षांत त्यांना गरिबी हटवता आली नाही. आता मात्र गरिबी हटविण्याची भाषा ते करत आहेत, अशा शब्दांत फडणवीस यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांवर हल्ला केला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाने काल मंजूर केला. तसेच जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. या घडामोडीची दखल मुख्यमंत्र्यांनी भाषणात घेतली.

राहुल गांधी यांच्या दौऱ्यापूर्वीच काँग्रेसचे विरोधी पक्षनेते, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले. जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. आमची कुठेही शाखा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी शुक्रवारी केली.

नगर जिल्ह्य़ाच्या विकासासाठी भाजपच्या सरकारने सुमारे अडीच हजार कोटी रुपये दिले. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नगर आणि नाशिक जिल्ह्य़ात वळविण्यासाठी केंद्र सरकार २४ हजार कोटी रुपये देणार असून त्यामुळे नद्या बारमाही वाहू लागतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

आपले वडील राधाकृष्ण विखे यांना लवकरच आपण भाजपमध्ये आणू, असे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे आणि अपक्ष उमेदवार भाऊ साहेब वाकचौरे हे दोघेही आमचेच आहेत. त्यांची किती ताकद आहे. ते किती पाण्यात आहेत हे आम्हाला माहीत आहे, असेही डॉ. विखे म्हणाले.

आमदार कर्डिले अनुपस्थित

सभेस आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर कदम अनुपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाचे राजाभाऊ  कापसे उपस्थित असले तरी पक्षाचे अन्य नेते मात्र अनुपस्थित होते. युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष अशोक गायकवाड आणि भाऊसाहेब पगारे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन युतीला पाठिंबा दिला. पूर्वी त्यांचा काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा होता.