09 August 2020

News Flash

दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले-धनंजय मुंडे

अनेक तालुक्यांमध्ये चारा छावण्या सुरुच झाल्या नसल्याचाही आरोप धनंजय मुंडे यांनी केला

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा आ वासून उभा आहे. मात्र दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकार निवडणूक प्रचारात दंग झाल्याचीही टीका त्यांनी केली. लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने आत्तापर्यंत राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये फिरताना अतिशय भीषण दुष्काळ जाणवल्याचेही मुंडे यांनी म्हटलं आहे.

यावर्षी राज्यात इतका भीषण दुष्काळ आहे की, मागच्या वर्षी याच काळात एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला राज्यात केवळ 611 टँकर्स सुरू होते, आज यावर्षी 3970 इतके सुरू आहेत. यावरून पाण्याच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येते. अनेक गावांमध्ये मागणी होऊनही टँकर्स सुरू झाले नाहीत असाही आरोपही त्यांनी केला.

औरंगाबाद, नाशिक आणि पुणे विभागातील जनावरांची संख्या 85 लाख असताना छावण्यांमधून केवळ 6 लाख जनावरांना आसरा मिळालेला आहे, लाखो जनावरांच्या चार्‍याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सरकारने चारा छावणीला द्यायचा की, थेट मदत द्यायची की, छावण्या उघडायच्या? याबाबत निर्णय घेण्यातच तीन महिने घालवले. शेतकर्‍यांची केवळ पाच जनावरे छावण्यांमध्ये घ्या, स्वयंसेवी संस्थांना प्राधान्य द्या, आढावा घ्या, छावण्यांचे अधिकार पालकमंत्र्यांना द्या, अशा जाचक अटी घातल्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये छावण्या सुरू झाल्याच नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

मागील काळात सरकारने जाहीर केलेली अनुदाने मिळालेली नाहीत, कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य पध्दतीने झालेली नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. अनेक मुलभूत प्रश्नांच्या पेक्षाही राज्यातील दुष्काळामुळे त्रस्त शेतकर्‍यांमध्ये सरकार विरूध्दचा तीव्र असंतोष पहावयास मिळत असून, हा असंतोष मतपेटीतून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2019 7:54 pm

Web Title: dhananjay munde criticized maharashtra government on farmer issue
Next Stories
1 जातीच्या आधारावर मतं मिळणार नाहीत हे पवारांना कळू लागलंय-विनोद तावडे
2 सपा, बसपा, काँग्रेसचा ‘अली’वर तर भाजपाचा ‘बजरंग बली’वर विश्वास – योगी आदित्यनाथ
3 तुमची झाली युती आणि माझी झाली माती : आठवले
Just Now!
X