विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येडं पेरलं आणि खुळं उगवलं असा टोला मारत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यात बोलताना विंग कमांडर अभिनंदन यांचा ‘हेलिकॉप्टरचा पायलट’ असा उल्लेख केला होता. अभिनंदन हे भारताच्या लढाऊ विमानांचे वैमानिक आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती. यावरुनच धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटल आहे की, ‘यांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-२१ आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष’. यावेळी धनंजय मुंडे यांनी बे एके बे…बे दुने चार…बे त्रिक बेअक्कल अशा शब्दांत टीका करत येडं पेरलं आणि खुळं उगवलं अशी टीका केली आहे.

काय बोलले होते रावसाहेब दानवे ?
तुम्ही चॅनेलवर पाहिलं असेल 24 तासाच्या आत पाकिस्तानी सैन्याने अभिनंदनला आपल्या देशात आणून सोडला. अरे एक पोलीसवाला आमची मोटारसायकल पकडतो, ट्रिपल सीट धरलं तर चार दिवस कोर्टातून सोडून आणावी लागते. आणि आपल्या हेलिकॉप्टरचा पायलट 24 तासांत सोडून आणला असा पंतप्रधान या देशाला पाहिजे.