पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रामधील पहिलीच जाहीर सभा वर्ध्यामधील स्वावलंबी मैदानात झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर मोदींनी आपल्या भाषणामधून निशाणा साधला. मोदींच्या भाषणाबरोबरच या सभेची चर्चा झाली तरी अर्धवट रिकाम्या राहिलेल्या मैदानामुळे. मोदींच्या या सभेला अपेक्षेहून खूपच कमी गर्दी पहायला मिळाली. यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारवर टिका केली आहे. ‘वर्धा सभेतील कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे,’ असं धनंजय मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

२०१४ भाजपाने वर्ध्यामधील मोदींच्या जाहीर सभेतूनच निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा केला. आज सकाळी साडे अकरा वाजता वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात मोदींची या वर्षीच्या निवडणूक प्रचारातील पहिली जाहीर सभा झाली. मात्र १८ एकरच्या या मैदानाचा अर्ध्याहून अधिक भाग रिकामाच होता. मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्क मैदानाचा आकार २७ एकर इतका आहे. म्हणजेच शिवाजी पार्क अर्धे भरेल इतकी गर्दीही मोदींच्या पहिल्या सभेला नव्हती. यावरुनच धनजंय मुंडेंनी सरकारवर ट्विटवरुन निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे म्हणतात, ‘वर्धा सभेतील कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे नक्की. २०१४ साली दिलेल्या आश्वासनांचा कित्ता गिरवून सत्तेची आस लावून घेण्यात अर्थ नाही हे त्यांनी जाणावे. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांचा चढता आलेख पाहता कुंभकर्ण कोण ते स्पष्टच आहे.’

दरम्यान या सभेतील रिकाम्या मैदानावरुन आयोजकांना अपेक्षित असणारी गर्दी सभेला न आल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. उन्हाळा आणि सभेच्या ठिकाणी मंडप नसल्याने अनेकांनी सभेकडे पाठ फिरवल्याचीही चर्चा आहे. या आधी २८ मार्च रोजी मोदींनी लोकसभा निवडणुकींसाठीचे रणशींग मेरठ येथील सभेमधून फुंकले त्यासभेतही मागील बाजूला खुर्च्या रिकाम्या असणारे फोटो व्हायरल झाले होते.