24 January 2020

News Flash

‘मुखवट्यामागे काय आहे याची कल्पना नव्हती’, विजेंदर सिंगची नरेंद्र मोदींवर टीका

'जेव्हा तुम्ही एखाद्याचं कौतुक करता तेव्हा मुखवट्यामागे काय आहे याची कल्पना नसते'

बॉक्सर विजेंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली असून मुखवट्यामागे काय आहे याची कल्पना नव्हती असा टोला लगावला आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेल्या विजेंदर सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फार चांगले संबंध होते. त्यांच्या चांगल्या संबंधांचे पुरावा देणारे अनेक फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. दोघांनी अनेकदा एकमेकांसाठी ट्विटही केलं होतं. विजेंदर सिंग यांनी पहिल्यांदा व्यवसायिक फाइट जिंकल्यानंतर मोदींनी त्याचं कौतुक केलं होतं. पण 2019 मध्ये चित्र बदललं असून विजेंदर सिंग यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांशी खोटं बोलले असा आरोप त्यांनी केला आहे.

‘जेव्हा तुम्ही एखाद्याचं कौतुक करता तेव्हा मुखवट्यामागे काय आहे याची कल्पना नसते. भाजपासाठी 2014 मध्ये मिळालेला विजय सर्वात मोठा होता’, असं विजेंदर सिंग यांनी सांगितलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, ’15 ते 20 लाख रुपये असेही गरिबांच्या खात्यात येतील. माझ्याकडे अजूनही तो युट्यूब व्हिडीओ आहे. ते खोटं होतं. लोकांनी आणि खासकरुन गरिबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला’.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान आपण काळा पैसा भारतात आणू, ज्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख जमा होतील असं म्हटलं होतं. नरेंद्र मोदी आपलं आश्वासन पूर्ण करु शकत नाहीत अशीही टीका त्यांनी केली आहे.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण दिल्लीमधून उमेदवारी देणं विजेंदर सिंगसाठी आश्चर्यकारक होतं. याआधी काँग्रेस या जागेसाठी 1984 शीखविरोधी दंगलीतील आरोपी सज्जन कुमारच्या भावाला तिकीट देणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. आपण कांग्रेस पक्षाची निवड का केली यावरही विजेंदर सिंगने भाष्य केलं आहे.

माझं व्हिजन, माझे विचार, माझी विचारसरणी अगदी काँग्रेसशी मिळती जुळती आहे. त्यांच्याकडे व्हिजन, प्लॅनिगं, सुशिक्षित लोक आणि चांगले नेत आहेत. काँग्रेस नेते भविष्याबद्दल चांगल्या गोष्टींबद्दल बोलतात असं विजेंदर सिंगने सांगितलं आहे. दिल्लीत 12 मे रोजी मतदान पार पडणार आहे.

First Published on April 24, 2019 11:52 am

Web Title: didnt know what was behind mask boxer vijender singh criticise narendra modi
Next Stories
1 रोहित शेखर यांच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक
2 निवृत्त झाल्यानंतर पंतप्रधान मोदी काय करणार?, जाणून घ्या..
3 अक्षय कुमारने विचारले, तुम्हाला राग येतो का?, मोदींनी दिले हे उत्तर
Just Now!
X