खा. दिलीप गांधी यांचे भाषण मध्येच थांबवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरमध्ये सभा झाली खरी, मात्र त्यांच्या आगमनापूर्वी सभेच्या व्यासपीठावर भाजपमधील पक्षांतर्गत मानापमानाचे नाटय़ घडले. भाषणात मावळते खासदार दिलीप गांधी यांना मध्येच त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी थांबवले गेल्याने ते संतप्त झाले होते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून, उमेदवारी डावलली गेल्याने नाराज असलेले दिलीप  गांधी यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही  देत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सकाळी अकरा वाजता सुरू होणार होती. मात्र ते शिर्डीहून नगरला आल्याने त्यांचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत नगरमधील सभेच्या व्यासपीठावर ११.३५ वा. आगमन झाले. तोपर्यंत नगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे, शिर्डीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासह विविध वक्त्यांनी भाषणे सुरू ठेवली. पंतप्रधानांचे आगमन केव्हाही होईल, या नियोजनानुसार प्रत्येक वक्त्याला दोन, पाच मिनिटे संधी दिली जात होती. भाषणे सुरू असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आगमन झाले. पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह जिल्ह्य़ातील भाजप-शिवसेनेचे आमदार व्यासपीठावर उपस्थित होते.

खा. गांधी यांचे शहरातील विरोधक शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी शहरात केंद्र सरकारच्या योजना राबवल्या गेल्या नाहीत, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, असा आरोप केला. त्यानंतर गांधी यांचे भाषण झाले. त्यांनी राठोड यांच्या आरोपांना उत्तर देण्यास सुरुवात केली. काही जण टीका करत आहेत त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी लेखाजोखा घेऊनच मी आलो आहे, असे गांधी म्हणाले. तेवढय़ात केंद्रीय मंत्री आठवले यांचे व्यासपीठावर आगमन झाले आणि जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी त्यांचे भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गांधी संतप्त झाले. त्यांनी लगेच माईकवरूनच बेरड यांना सुनावले. त्यामुळे बेरड बाजूला गेले, गांधी यांनी दोन मिनिटे तरी बोलू देणार की नाही, आरोप होत असताना त्याचे स्पष्टीकरण तरी देऊ देणार की नाही, अशी संतप्त भावना व्यक्त केली. त्यांच्या आवाजात कंप निर्माण होऊन त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याची जाणीव व्यासपीठावरील सर्वानाच झाली. हा सर्व प्रकार व्यासपीठावर सर्वासमक्ष सुरू होता. अखेर गांधी यांनीच आपले भाषण थांबवले. नंतर उमेदवार डॉ. विखे यांनी त्यांना बाजूला नेले.

विद्यमान खासदार असताना उमेदवारी डावलली गेल्याने खा. गांधी नाराज आहेत. त्यांच्या या नाराजीची दखल मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात घेतली. गांधी यांनी चांगले काम केले, केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या, परंतु काँग्रेसवरील सर्जिकल स्ट्राईकमुळे विखे यांना उमेदवारी द्यावी लागली, गांधी यांच्या पाठीशी आपण उभे आहोत, अशी समजूत मुख्यमंत्र्यांनी काढली.