लोकसभा निवडणुकीसाठी २९ एप्रिल रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील मतदान चार दिवसांवर आले असताना पालघर लोकसभा निवडणूक क्षेत्रातील मतदारांमध्ये जाऊन प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे नेते चिंतेत आहेत. त्याच वेळी शहरी भागांतील मतदारांनी उन्हाळी सुटीत गावी जाण्यासाठी सामानाची बांधाबांध सुरू केल्याने, आधी मतदान करा, नि मगच गावी जा, अशी विनवणी वसई-विरारमधील राजकीय कार्यकर्त्यांनी मतदारांना घालण्यास सुरुवात केली आहे.

तर पालघर लोकसभेसाठी शिवसेना, बहुजन विकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत असून या दोन्ही पक्षांनी अजून कार्यकर्त्यांमध्येच उत्साह भरला नसल्याचे चित्र आहे. अद्याप कार्यकर्त्यांसाठी सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. कार्यकर्त्यांमध्ये कमालीची मरगळ दिसून येत आहे. तर वसई विरार शहरांमध्ये मुलांच्या परिक्षा संपल्याने गावी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने त्यांना मतदानाच्या दिवसापर्यंत थोपविण्याचे नवे आव्हान कार्यकर्त्यांसमोर आहे. त्यामुळे नाक्यावर, घरोघरी जाऊन आधी मतदान करा अशी विनंती केली जात आहे. वसई-विरारमध्ये कोकणातील तसेच उत्तर भारतातील मतदार मोठय़ा प्रमाणावर आहे. नालासोपारा आणि विरार पूर्वेला असलेल्या चाळीत हा मतदार राहात आहेत. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात हा मतदार आपल्या गावी जात असतो. त्यामुळे या मतदारांना रोखा असे आदेशच पक्षाच्या नेत्यांनी दिले आहे. त्यामुळे कार्यकर्ते दररोज संध्याकाळी होणाऱ्या नाका बैठकीत मतदान करा आणि गावी जा असे सांगत आहे. ज्या मतदारांनी गावी जाण्याची तिकिटे काढली आहेत, त्यांना ती रद्द करून नवीन तिकीट काढण्याचे पैसे दिले जात आहेत.

ही आमची हक्काची मते आहेत. तीच कमी झाली तर वरिष्ठांकडून आम्हाला शिव्या पडतील शिवाय मतदानही कमी होईल, म्हणून आम्ही त्यांना गावी जाण्यापासून थांबवत आहोत, असे एका कार्यकर्त्यांने सांगितले.  पालघर लोकसभा मतदारसंघात येत्या २९ एप्रिल रोजी राज्यातील चौथ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात आहे. बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना यांच्यात सरळ लढत आहे.

मद्य विक्रीवर निर्बंध

सरकारच्या मान्यता असलेल्या मद्यविक्री केंद्रांवर येणाऱ्या परवानाधारक नागरिकांना शासकीय नियमानुसार महिन्याला दोन युनिट (मद्य बाटल्या) देण्याचे निर्बंध पाळण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे परवाना नसलेल्या नागरिकांनी मद्याची मागणी केल्यास त्यांना एक दिवसाचा मद्य परवाना घेतल्यानंतरच त्यांना मद्य देण्यात येत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी शासकीय विभागांकडून सरकारमान्य मद्य विक्री केंद्र आणि अशा प्रकारच्या इतर दुकानांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. असे असताना दमण, सेल्वास या केंद्र शासित प्रदेशातील मद्य निवडणूक काळात अनेक मेजवान्यांमध्ये सेवन केले जाते.