महेश सरलष्कर

लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशाचा उत्साह भाजपच्या मुख्यालयात गुरुवारी दिवसभर साजरा केला जात होता. पण, चर्चा होती ती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठीतील पराभवाची! केरळमधील वायनाडमधून सुमारे आठ लाख मताधिक्याने राहुल गांधी यांनी विजय मिळवल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात होते.

विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात भाजप कार्यकर्त्यांचा संताप उत्स्फूर्तपणे बाहेर येत होता. चंद्राबाबू नायडू यांना स्वतचे आंध्र प्रदेशदेखील राखता आले नाही. हेच चंद्राबाबू मोदींविरोधात सरकार बनवायला निघाले होते. चंद्रशेखर राव यांनाही फटका बसला बरेच झाले. मोदींना ममता बॅनर्जीनी खूप त्रास दिला होता. आता पुन्हा मोदीच सत्तेवर येणार मग ममता काय कारणार?.. ममता यांच्या तुलनेत मायावती, अखिलेश यादव बरे होते, निदान उत्तर प्रदेश पुरताच त्यांच्या कारभार होता.. अशा रंगतदार गप्पा भाजप कार्यकर्त्यांमध्ये रंगलेल्या होत्या.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात आनंदही व्यक्त होत होता. राहुल वायनाडमधून विजयी झाले असतील पण अमेठीतून पराभूत झालेच. राहुल गांधींना आता कळेल पराभव म्हणजे काय असतो! या व्यक्तीने कधी दोन रुपये कमावले नाहीत. अन् देशातील तरुणांना २४ लाख नोकऱ्या देण्याच्या गोष्टी केल्या जात होत्या.. अमेठीत गांधी कुटुंबाची सद्दी संपल्याचे समाधान भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर होते. पत्रकार कक्षाच्या बाहेर तसेच पहिल्या मजल्यावर असलेल्या दूरचित्रवाणीसमोर सकाळपासून कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती. टीव्हीच्या पडद्यावर राहुल गांधी दिसले की हुर्ये हुर्ये केले जात होते. ‘राहुल गांधी जय श्रीराम’चा नारा दिला जात होता. ममता बॅनर्जी दिसल्या तरीही ‘ममतादीदी जय श्रीराम’चा आवाज घुमत होता. भाजप कार्यकर्त्यांचा सर्वाधिक राग ममता बॅनर्जी यांच्यावरच असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून जाणवत होते.

भाजपचे मुख्यालय खच्चून भरलेले होते.  नेत्यांच्या खोल्या कार्यकर्त्यांनी भरून गेलेल्या होत्या. वातानुकूलित हवेत विजयाचा आनंद हे कार्यकर्ते लुटताना दिसत होते. ज्येष्ठ नेत्यांपैकी राष्ट्रीय पक्ष समन्वयक रामलाल हेच भाजप मुख्यालयात होते. पहिल्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत मॅरॅथॉन बैठका सुरू होत्या. त्यांना भेटण्यासाठी रांग लागलेली होती. उत्तराखंडमधून आलेल्या महिला कार्यकर्त्यांचा गट रामलाल यांची बराच वेळ वाट पाहत होता. गेल्या वेळी (२०१४) गंगामय्याने बोलवले होते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत राहिले, आता केदारनाथने बोलावले आहे, बघा मोदी कसे तांडव करतात, अशीही प्रतिक्रिया ऐकायला मिळत होती.

२०१४ मध्ये वाराणसीमधून लोकसभेची निवडणूक लढवताना गंगा मातेने बोलावल्यामुळेच आपण वाराणसीतून उभे राहिलो असल्याचे मोदी यांनी सांगितले होते. या वेळी मतदानाच्या अखेरच्या टप्प्याआधी मोदी यांनी केदारनाथला जाऊन गुहेत मनन-चिंतन केले होते. शंकराच्या मंदिराला मोदींनी भेट दिल्याचा संदर्भ देत मोदी राजकीय तांडव करतील अशी एका कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.

पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागतासाठी उन्हात कार्यकर्ते नाचत होते. दुपारी तीनच्या सुमारास शहा यांची नेते आणि पदाधिकाऱ्यांबरोबर बैठकही झाली.