नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापकांमध्ये वाद सुरू आहे. एका गटाने मोदींचा विरोध केला आहे तर दुसऱ्या गटाने पाठिंबा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत राहुल गांधी यांच्यावर टीका करताना, तुमच्या वडिलांना खुशमस्करे जरी मिस्टर क्लीन म्हणत असले तरी भ्रष्टाचारी क्रमांक एक म्हणून ते अखेरीस गणले गेले असा आरोप केला होता. त्यानंतर वाद सुरू झाला. अशा पद्धतीचे वक्तव्य करून पंतप्रधानांनी पदाची प्रतिष्ठा खालावली असा आरोप प्राध्यापकांच्या एका गटाने केला होता. राजीव गांधी यांचे योगदान देशाला माहीत आहे असे या निवेदनात स्पष्ट केले होते. तर प्राध्यापकांच्या दुसऱ्या गटाने मोदींना पाठिंबा दिला आहे. राजीव गांधी यांच्या काळातील भ्रष्टाचार जनतेच्या लक्षात आणून देण्यात काहीच गैर नाही असे या प्राध्यापकांचे म्हणणे आहे. बोफोर्स व्यवहार हे तर या गैरव्यवहाराचे प्रतीक होते. तेथूनच टूजी, राष्ट्रकुल स्पर्धा अशी घोटाळ्यांची मालिकाच होती असे या निवेदनात आहे.

दरम्यान, दिल्ली विद्यापीठ, जेएनयू, जामिया मिलिया इस्लामिया इत्यादी ठिकाणच्या ७०० प्राध्यापक, संशोधकांनी जनतेला पुरोगामी, भ्रष्टाचारमुक्त व राष्ट्रवादी असे मोदींच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार निवडून देण्याचे आवाहन केले आहे. गेल्या पाच वर्षांत सर्वच पातळ्यांवर मोदी सरकारने देशाचा नावलौकिक जगात वाढविला असे त्यांनी स्पष्ट केले आहे.