जळगाव : पक्षातंर्गत गटबाजी, वर्चस्वावरून सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण आणि त्यातून उदयास आलेली एकाधिकारशाही यामुळे जिल्ह्य़ातील भाजपमध्ये काही महिन्यांपासून सुरू असलेले वाद अंमळनेरमधील हाणामारीमुळे चव्हाटय़ावर आले. महायुतीच्या मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्षांनी गिरीश महाजन यांच्यासमोर आपल्याच पक्षाच्या माजी आमदाराला लाथाबुक्कय़ांनी मारल्याने भाजपच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे. याचा प्रतिकूल परिणाम पक्षावर होईल, अशी चिंता भाजपला आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत सर्वच बाबतीत पिछाडीवर पडलेल्या खान्देशातील जळगाव जिल्ह्य़ास सर्वप्रथम विकासाचे स्वप्न कोणी दाखविले असेल तर ते भाजपने. तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना आणि पाडळसरे, शेळगाव बॅरेजची पायाभरणी तत्कालीन युती सरकारच्या काळात झाली होती. विकासापासून कोसो दूर राहिलेल्या जिल्ह्य़ातील मतदारांनी त्यामुळे साधारणत: १९९१ पासून लोकसभेच्या सलग सहा निवडणुकांमध्ये भाजपच्या पदरात मतांचे भरघोस दान टाकले. काँग्रेससाठी हक्काची मतपेटी मानला जाणारा लेवा पाटील, मराठा तसेच अन्य ओबीसी समाज भाजपकडे वळविण्यासाठी एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे राहिले. पंचायत समित्या, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सगळीकडे भाजपचेच वर्चस्व दिसू लागले. दरम्यानच्या काळात खडसेंच्या जोडीला जामनेरमधून गिरीश महाजन यांच्या रूपाने नवीन नेतृत्व उदयास आले आणि भाजपची वाटचाल आणखी सुसह्य़ झाली. दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय कायम असेपर्यंत भाजपमध्ये सर्व काही ठिकठाक होते. परंतु, मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आल्यानंतर खऱ्या अर्थाने खडसेंचा पडता काळ सुरू झाला. मुख्यमंत्र्यांना जवळचे म्हणून महाजन यांना चांगले दिवस आले.  त्याचा परिणाम स्थानिक राजकारणावरही झाला.

भाजपमध्ये दोन्ही नेत्यांना मानणारे दोन गट निर्माण झाले. त्यातूनच अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला चालना मिळून एकमेकांचे पाय खेचण्याचे प्रकार वाढले. नेत्यांमधील बेबनाव बघून पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मनमानी करू लागले. शिस्त, सुसंस्कृतपणासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपच्या व्यासपीठावर  हाणामारी होऊ लागली. महाजन यांच्याकडे सूत्रे आल्यापासून जिल्ह्य़ात भाजपमध्ये वादाचे प्रसंग उद्भवले. खडसेंकडे नेतृत्व असतानाचा एकोपा संपुष्टात आला आहे.

लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी खासदार ए. टी. पाटील यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारी चित्रफीत प्रसारित झाली. त्यानंतर आमदार स्मिता वाघ यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असताना अचानक त्यांच्याऐवजी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. या सर्व वेगवान घडामोडीत कार्यकर्त्यांची भावना कोणीच विचारात घेतली नाही. ‘हम करे सो कायदा’ या न्यायाने तडकाफडकी निर्णय घेताना नाराजांना विश्वासात घेण्याचे भानही नेत्यांनी ठेवले नाही. नाराजीतून बंडाची भाषा करणाऱ्यांना निवडणुकीत तुम्ही अनामत रक्कम तर वाचवून दाखवा, असे आव्हान देत वातावरण तापवले गेले. मेळावे घेऊन पक्षविरोधी भाषा करणाऱ्यांना वेळीच जाब विचारला गेला नाही. त्यामुळे बेताल वक्तव्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे चांगलेच फावले. अंतर्गत वादातून पडलेली ठिणगी वेळीच विझविण्याची काळजी न घेतल्याने शेवटी व्हायचे ते झाले. पक्षांतर्गत वादातून धुमसणारा ज्वालामुखी अखेर उफाळून आला.

काँग्रेस आघाडीत आनंद

अंमळनेर येथे युतीच्या मेळाव्यात हाणामारी होऊन भाजपची अब्रू वेशीवर टांगली गेली. भाजपमध्ये ‘संकटमोचक’ मानले जाणारे गिरीश महाजन यांनाही धक्काबुक्की झाली. विधानसेवर तीनवेळा निवडून आलेले माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना व्यासपीठावर भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्य़ांनी मारले. हा सर्व प्रकार बघता सामान्यांचा भाजपकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. सर्वापेक्षा वेगळा पक्ष असे बिरुद मिरविणाऱ्या भाजपमध्ये सत्तेच्या हव्यासातून सुरू झालेले राजकारण पाहून प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीत मात्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.