जिल्हाधिकाऱ्यांचे उमेदवारांना आवाहन

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या विविध टप्प्यांवर काहीवेळा तांत्रिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्या गृहीत धरून निवडणूक कार्यपद्धतीत त्यावर उपाययोजनाही नमूद करण्यात आल्या आहेत. यामुळे अशा प्रकारची तांत्रिक समस्या उद्भवल्यास मतदान प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी अथवा अन्य व्यक्तींनी ही कार्यपद्धती शांतपणे अनुसरणे अपेक्षित आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे उद्विग्न होऊन गडबडगोंधळ होणार नाही, याबाबतच्या सूचना उमेदवारांनी आपण नियुक्त केलेल्या प्रतिनिधींना द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा नाशिक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी केले. .

जिल्ह्य़ात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जय्यत तयारी करीत आहे.

पहिल्या टप्प्यात देशात ज्या भागात मतदान झाले, तिथे काही ठिकाणी व्हीव्हीपॅट किंवा मतदान यंत्र बंद पडण्यामुळे मतदानाला विलंब असे काही प्रकार घडले. यामुळे काही मतदान केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मतदार यादीतील गोंधळ मागील निवडणुकांमधून नाशिककरांच्या परिचयाचा झाला आहे. मतदानास गेलेल्या उमेदवारांचे नांव न सापडणे, यादीतून नांव परस्पर वगळले असणे, एका भागातील मतदारांची नांवे अन्य भागातील यादीत समाविष्ट होण्याचे प्रकार आधी घडलेले आहेत. मतदार यादीतील घोळाबाबत राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. ही एकंदर पाश्र्वभूमी लक्षात घेऊन बहुदा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक उमेदवाराला शुभेच्छा देताना त्यांच्या प्रतिनिधींना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे.

आगामी निवडणूक काळात इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट, यंत्र जोडणी करून सीलबंद करणे, निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, मतदान साहित्य वाटप, प्रत्यक्ष मतदान असे विविध टप्पे पार पडणार आहेत. त्यात काही वेळा तांत्रिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजनाही तयार आहेत. अशा प्रकारची तांत्रिक समस्या उद्भवल्यास मतदान प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी अथवा अन्य कोणी व्यक्तीने ही कार्यपध्दती शांतपणे अनुसरावी, अशी अपेक्षा मांढरे यांनी व्यक्त केली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे गडबड गोंधळ होणार नाही, याबाबत उमेदवारांनी आपण नेमलेल्या प्रतिनिधींना स्पष्ट सूचना द्याव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.

उमेदवारांना ‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून माहिती

नाशिक जिल्हा निवडणूक प्रशासनाने उमेदवारांचा एक स्वतंत्र व्हॉट्स अ‍ॅप समूह तयार केला असून त्यावर  सर्व माहिती वेळोवेळी दिली जाणार आहे. या माहितीचे उमेदवारांनी नियमित वाचन करावे. निवडणूक आणि खर्चविषयक आचारसंहितेबाबतच्या सूचनांचे पालन करावे. त्या सूचनांचे उल्लंघन होणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी, असे मांढरे यांनी पत्रात म्हटले आहे.