स्थानिक समस्या मांडणाऱ्या मतदारांना ‘लोकसभे’चे महत्त्व सांगत संवाद

मुंबई : समाजमाध्यमे आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे निवडणुकीच्या प्रचाराचे तंत्र बदलत चालले असले तरी, मतदारांच्या भेटीगाठी आणि गल्लोगल्ली निघणाऱ्या प्रचारफेऱ्यांचे महत्त्व अजूनही कायम आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या तेच चित्र दिसत आहे. येथील काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी गल्लोगल्ली जाऊन छोटय़ा प्रचारसभांवर भर दिला आहे. मात्र, या भागांतील भेटीदरम्यान मतदारांकडून स्थानिक नागरी समस्याच मोठय़ा प्रमाणात मांडल्या जात असल्याचे दिसून आले.

गत लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रिया दत्त या राजकारणापासून दूर गेल्याचे चित्र होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळाल्यापासून त्यांनी नव्या जोमाने प्रचाराला सुरुवात केली आहे. यंदा काँग्रेससोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही त्यांच्या प्रचारफेरीत सहभागी होत आहेत. गतवेळच्या तुलनेत यंदा हा ठळक बदल दिसतो. मात्र, मोजके कार्यकर्ते वगळता दत्त यांच्या प्रचारफेरीत फारशी गर्दी दिसत नाही.

सध्या त्या वांद्रे पश्चिम येथील गल्ल्यागल्ल्यांमध्ये प्रचार करत आहेत. येथील एका महत्त्वाच्या चौकात खुर्च्या, टेबल मांडून छोटेखानी सभेची तयारी करण्यात आली होती. जेजे कॉलनीत दत्त यांचे आगमन होताच फटाक्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले गेले. प्रत्यक्ष सभेत मांडलेल्या बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या. मात्र, इमारतीच्या गॅलरी, खिडक्यांतून डोकावून पाहणाऱ्यांशी दत्त यांनी संवाद सुरू केला.

‘ही निवडणूक पाणी किंवा शौचालयांच्या समस्यांपुरती सीमित नाही. आपल्या विचारधारेला, बोलण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर आलेल्या संकटाशी आहे. त्यामुळे लोकांनी विचार करून सत्ता कोणाच्या हातात द्यायची हे ठरवावे. समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या संदेशांना तरुण मुलांनी बळी पडू नये याची काळजी आपण घेणार आहोत,’ असे प्रिया दत्त काँग्रेसच्या पाठीमागे वर्षांनुवर्षे उभ्या राहिलेल्या येथील मतदारांसमोर भाषण करताना नमूद करतात. या मुस्लीमबहुल परिसरात त्यांनी आणि त्यांचे वडील सुनील दत्त यांनी केलेल्या कामांचाही पाढा वाचला जातो.

सायंकाळी चारपासून सुरू झालेली ही पायपीट रात्री उशिरापर्यंत सुरू असते. एकामागोमाग एक गल्ली पालथी घालत असताना प्रिया दत्त यांची होणारी दमछाक त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसून येते. त्यातच  पत्रकार, कार्यकर्ते, संस्था-संघटनांशी संवाद अशा कार्यक्रमामुळे सायंकाळी चापर्यंतचा त्यांचा दिवसही गजबजलेला असतो. मात्र, तरीही मतदारांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्यावर त्यांचा भर कायम आहे. ‘मोठय़ा प्रचार सभांमध्ये निवडणुकीसाठीचे वातावरण तयार होते हे खरे असले तरी प्रत्यक्ष संवाद साधला जात नाही. सध्या लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे या काळात अधिक महत्त्वाचे वाटते,’ असे त्या म्हणतात.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीला वांद्रे पश्चिम येथील राजीव नगर, जेजे कॉलनी, नुरानी गल्ली अशा भागात केवळ ३८ टक्के मतदान झाले होते. हीच परिस्थिती इतरही मुस्लीमबहुल भागात होती. मोदी लाटेमुळे या भागात तेव्हा निरुत्साह होता. याचा वेळोवेळी उल्लेख करत प्रिया दत्त, हा निरुत्साह यंदाच्या वेळेस दाखवू नका, असे आवाहन मतदारांना करत आहेत.

निवडून आल्यापासून गेल्या पाच वर्षांत एकदाही पूनम महाजन या विभागात फिरकल्या नसल्याने इथल्या लोकांमध्ये नाराजी आहे. एकीकडे पूनम महाजन यांच्याबाबत इथल्या जनतेमध्ये कडवा विरोध असला तरी एक गट आमदार आशीष शेलार यांना मानणारा आहे. त्यामुळे इथली मते पूनम महाजन यांच्या नव्हे तर आशीष शेलारांकडे बघून दिली जातील, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

प्रचाराचे रंग-ढंग : वडिलांचा वारसा

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर प्रिया दत्त यांनी २०१९ची निवडणुक लढवणार नसल्याची भूमिका घेतली. परंतु, वरिष्ठांनी मन वळविल्यानंतर त्यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. पूनम महाजन यांच्या मागे प्रमोद महाजन यांचा तर प्रिया दत्त यांच्या मागे सुनील दत्त यांचा वारसा आहे.