मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

वाई : माढा काय अन् बारामती काय, आम्ही सातारा सुद्धा जिंकणारच. साताऱ्यातील लढाई ही राजा विरुद्ध प्रजा अशीच आहे. राजांबद्दल मी काही बोलणार नाही, कारण सगळ्यांना सगळे माहीत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे सातारा जिल्ह्यावर दुष्काळाचा कलंक लागला आहे. हा कलंक आम्ही पुसणार आहोत. सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून नरेंद्र पाटील हेच खासदार होणार आहेत,  असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

कोरेगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील, पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विक्रम पावस्कर, मदन भोसले, कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष महेश शिंदे, मनोज घोरपडे, अशोक गायकवाड, संतोष जाधव, राहुल बर्गे यांच्यासह जिल्ह्यतील मान्यवर उपस्थित होते.

फडवणीस पुढे म्हणाले, की शरद पवार यांनी अगोदर माढय़ातून लढण्याची जोरदार तयारी केली होती. स्वत:ची उमेदवारी जाहीर करून ते स्वत: फिरले. मात्र, हवेची दिशा कळल्यानंतर त्यांनी माघार घेतली. त्यामुळे माढा, बारामती आणि सातारा आम्ही जिंकणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सातारा जिल्ह्याला दुष्काळाचा कलंक लावण्याचे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ५० वर्षांत केले असून, जिल्ह्याचे पाणी इतर जिल्ह्याला देताना शांत बसण्याचे महापाप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून सुमारे चार हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करत असताना केंद्रीय जल आयोगाची मान्यता देखील या प्रकल्पांना दिली आहे. कोरेगाव तालुक्यात जिहे कठापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच पाणी योजनांना निधी देण्याचे काम केले आहे.

सातारा उरमोडी, वसना-वांगणासह धोम बलकवडी योजनांची कामे मार्गी लावली आहेत. नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांचे वारसदार असून, अत्यंत प्रामाणिक नेते आहेत. त्यांना मोठय़ा मताधिक्याने विजयी करत खासदार करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

साताऱ्याच्या विद्यमान खासदारांनी दहा वर्षांत कसलेही ठोस काम केले नाही, असे सांगून नरेंद्र पाटील म्हणाले, की त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही, केंद्र आणि राज्य सरकारनी केलेली कामे व योजना स्वत:च्या नावावर खपवत आहेत. जिल्ह्यत जास्त धरणे असतानाही अनेक तालुके पाण्यावाचून उपाशी आहेत. जिल्ह्यचे पाणी इतर जिल्ह्यला दिले जात असताना, खासदार महोदय शांत बसले, त्यांना सामान्य जनतेबद्दल काही देणेघेणे नाही, असेही ते म्हणाले. या वेळी महेश शिंदे यांचे भाषण झाले.