सागर नरेकर

कार्यकर्त्यांत संभ्रम; सभेला कमी गर्दी

कलानी कुटुंबातील सदस्यांच्या परस्परविरोधी राजकीय भूमिकांमुळे उल्हासनगरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा आहे. या संभ्रमामुळेच मंगळवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची  बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ झालेली सभा फसल्याचे मत व्यक्त होत आहे.

उल्हासनगर शहरात ज्योती कलानी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत. त्यांची सून पंचम कलानी भाजपच्या महापौर आहेत, तर त्यांचा मुलगा ओमी कलानीच्या ‘टीम ओमी कलानी’ने लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. एकाच कुटुंबाच्या विविध राजकीय भूमिकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कमालीचा संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे.

उल्हासनगर हे शहर एके काळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड मानले जात असे. मोदी लाटेतही भाजपचा पराभव करत पप्पू कलानी यांच्या पत्नी ज्योती राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाल्या. मात्र पप्पूपुत्र ओमी यांच्या बदलत्या भूमिकेमुळे सध्या शहरात राष्ट्रवादीची बिकट अवस्था झाली आहे. आमदार आई राष्ट्रवादीचा प्रचार करत आहे, तर मुलगा ओमी आणि सून पंचम शिवसेनेच्या गोटात आहेत.  ज्योती या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. टीम ओमी भाजप आणि सेनेच्या गोटात असले तरी आमदार ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या प्रचारात दिसाव्यात यासाठी नाईक स्वत प्रयत्न करताना दिसत आहेत. मंगळवारी उल्हासनगर येथे आयोजित केलेल्या शरद पवार यांच्या सभेतही ज्योती यांना शिवसेनेच्या पराभवासाठी मतदारांना आवाहन करावे लागले. असे असले तरी ज्योती यांच्या आवाहनानंतरही टीम ओमी आणि कलानी कुटुंबीयांचे समर्थक मात्र शिवसेनेच्या प्रचारात जुंपल्याचे दिसले.

निष्ठावान दुरावले?

टीम ओमीच्या भूमिकेमुळे स्थानिक पालिका निवडणुकीत आमदार ज्योती कलानी यांची कोंडी झाली. आपल्याच मुलाविरुद्ध आणि सुनेविरुद्ध प्रचार कसा करावा या विचारातून त्यांनी राष्ट्रवादीचा प्रचारच टाळला होता. मुलाच्या सांगण्यावरून शिवसेनेचा प्रचार करावा की आईच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीचा अशी कार्यकर्त्यांची द्विधा मन:स्थिती आहे. निष्ठावान राष्ट्रवादी कार्यकर्ते चार हात दूर राहू लागल्याचे कळते.