नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ चरित्रपटाचे प्रदर्शन निवडणूक काळात करण्यास निवडणूक आयोगाने बुधवारी बंदी घातली. राजकीय नेता किंवा व्यक्ती जनमानसावर परिणाम करणाऱ्या ‘इलेक्ट्रॉनिक’ माध्यमातून दाखवू नये, या आचारसंहितेतील नियमाचा चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे भंग होत असल्याचे आयोगाने म्हटले. त्याचबरोबर नमो टीव्हीचे प्रसारणही याच कारणासाठी रोखण्यात आले आहे.

आयोगाच्या आदेशामुळे आज, (गुरुवारी) प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता निवडणुकीनंतरच प्रदर्शित होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवारी (आज) होत असताना या निर्णयास विशेष महत्त्व आले आहे.

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने चित्रपट प्रदर्शनाविरोधातील याचिका फेटाळताना याचिकाकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागावी असे म्हटले  होते. या चित्रपटास परिनिरीक्षण मंडळाची मंजुरी मिळण्याआधीच्या (पान ८ वर) (पान १ वरून)  टप्प्यात त्यावर बंदी घालण्याची याचिका आम्ही विचारात घेऊ  शकत नाही, असे न्यायालयाचे म्हणणे होते.

चित्रपटाचा दृश्यतुकडा (ट्रेलर) याचिकाकर्त्यांने दाखल केला आहे तो पुरेसा नाही, त्यासाठी सगळ्या चित्रपटाची प्रत जोडणे आवश्यक होते. कारण या चित्रपटाचा काय परिणाम होईल याचा अंदाज दोन मिनिटांच्या ट्रेलरवरून बांधणे अवघड आहे. जरी हा चित्रपट भाजपकडे झुकणारा आहे असे वाटत असेल तर याचिकाकर्त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, असे सोमवारी न्यायालयाने म्हटले होते.  या चित्रपटाची जाहिरातही आचारसंहितेचा भंग करणारी आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

चित्रपटास ‘यू’ प्रमाणपत्र

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटास केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने ‘यू’ प्रमाणपत्र दिले आहे.  या चरित्रपटामुळे भाजपला निवडणुकीत फायदा होईल, कारण तो लोकसभा निवडणुकीच्या आधीच प्रदर्शित होत आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे.

बंदीचा आदेश नमो टीव्हीलाही 

नवी दिल्ली :  निवडणूक आयोगाने मोदी यांच्यावरील चित्रपटाच्या निवडणूक काळातील प्रदर्शनावर घातलेली बंदी नमो टीव्हीलाही लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नमो टीव्हीचे प्रसारण निवडणूक काळात करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. चित्रपटाबाबत जारी करण्यात आलेल्या आदेशातील एका परिच्छेदाचा उल्लेख करून या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, आदर्श आचारसंहिता लागू असताना संभाव्य किंवा ठरलेल्या उमेदवाराची छबी इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर दाखवता येत नाही, या नियमानुसार मोदी यांच्या चरित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे,  ती नमो टीव्हीच्या प्रसारणासही लागू आहे. नमो टीव्हीवरून पंतप्रधानांची भाषणे व कार्यक्रम प्रसारित केले जात आहेत.  याआधी निवडणूक आयोगाने दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नमो टीव्हीचा आशय हा स्थानिक माध्यम व देखरेख समितीने प्रमाणित केला आहे की नाही, याची खातरजमा करून घ्यावी, असा आदेश दिला होता.