सीबीआयमार्फत चौकशीची काँग्रेसची मागणी

मुंबई : विदर्भातील कीटकनाशक फवारणीत विषबाधा होऊन ४० हून अधिक  शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले होते, ते कीटकनाशक बनविणाऱ्या कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात भाजपच्या प्रचार साहित्याची निर्मिती केली जात होती, त्याचबरोबर याच कंपनीला देण्यात आलेले देवनार कचराभूमी कंत्राट वादग्रस्त ठरले होते, त्यामुळे या प्रकारणांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

या प्रकरणात बेकायदा प्रचार साहित्य तयार करण्याच्या संदर्भात संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी

दिली.  केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल हे या कंपनीचे स्वतंत्र संचालक आहेत. तसेच मुंबई महानगरपालिकेने या कंपनीला देवनार कचरा भूमीच्या  व्यवस्थापनाचे साडेचार हजार कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते, असे सावंत यांचे म्हणणे आहे.  काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या साथीने मंगळवारी युनायटेड फॉस्फरस कंपनीच्या कार्यालयावर छापा घालून भाजपच्या प्रचारसाहित्याची निर्मिती केली जात होती, हे उघडकीस आणले.

गोयल यांनी आरोप फेटाळले

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व  शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सचिन सावंत यांचेआरोप फेटाळून लावले. काँग्रेस जुनी प्रकरणे काढून हाकनाक आरोप करीत आहे. प्रदीप गोयल हे या कंपनीचे स्वतंत्र संचालक आहेत, त्यांचा त्या कंपनीच्या दैनंदिन कामकाजाशी काहीही संबंध नाही, असे गोयल यांनी म्हटले आहे. तर देवनार कचरा भूमीचे दहा वर्षे पूर्वीचे जुने प्रकरण आहे, काँग्रेस सरकारच्या काळात त्या कंपनीला जमीन दिली नाही म्हणून महापालिकेकडून कंत्राट रद्द करण्यात आले होते, अशी माहिती तावडे यांनी दिली.