16 October 2019

News Flash

रविवारची संधी साधत उमेदवारांचा प्रचार

मुंबई- ठाणे परिसरातील सर्वच मतदारसंघात २९ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईत मतदान होत असून रविवारच्या सुट्टीची संधी साधत युती व कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी पदयात्रा, प्रचारफे ऱ्या आणि घरोघरी जाऊन थेट संवादाच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला.

मुंबई- ठाणे परिसरातील सर्वच मतदारसंघात २९ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. प्रचाराच्या नियोजनाच्या जोर बैठका संपल्यानंतर राजकीय पक्ष, उमेदार आणि कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरून थेट मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यातच आज रविवारी सुट्टीच्या दिवसाची संधी साधत कडक उन्हाची कसलीही तमा न बाळगता बहुतांश उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला. काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा, संजय निरुपम, प्रिया दत्त, ऊर्मिला मातोंडकर आणि एकनाथ गायकवाड यांनी दिवसभर चौकसभा, मोठय़ा गृहसंकुलात बैठका तसेच झोपडपट्टीत जाऊन मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहचविली. ऊर्मिला मातोंडकर यांनी आपल्या मतदार संघातील बुद्धविहारात जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. प्रचार फेरींच्या मतदारांशी संवाद साधतानाच मातोंडकर या कांदिवलीत मैदानावर जाऊन क्रिकेट खेळल्या. शिवसेनेचे अरविंद सावंत, राहुल शेवाळे, गजानन कीर्तीकर आणि भाजपचे गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक यांनी  प्रचार फेरी, चौकसभा आणि घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला. मनोज कोटक यांनी सकाळी बॅडमिंटन खेळत प्रचार केला. शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी शेवाळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत  प्रचार केला.

सर्वपक्षीय नेत्यांचे बाबासाहेबांना अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनोज कोटक, किरीट सोमय्या यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. कॉँग्रेसच्या मिलिंद देवरा, संजय निरुपम, प्रिया दत्त, ऊर्मिला मातोंडकर आणि एकनाथ गायकवाड यांनीही चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

First Published on April 15, 2019 1:20 am

Web Title: election campaign in mumbai