|| प्रथमेश गोडबोले

शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गिरीश बापट यांच्या संवादफेकीला वकिलांकडून टाळ्यांची दाद

गुरुवारी दुपारी साडेतीन-चारची वेळ. शिवाजीनगर न्यायालयात नेहमीप्रमाणे वकील, अशील आणि पोलिसांची गर्दी. अचानक गिरीश बापट ऊर्फ भाऊ न्यायालयातील वकिलांच्या दालनात प्रवेश करतात. भाऊंकडून दालनात असलेल्या दत्ताची आरती झाल्यावर संवादाला सुरुवात होते. ‘मला मत द्या, असे सांगायला मी आलेलो नाही. कारण मला माहीत आहे, तुम्ही मलाच मत देणार आहात. माझे आतापर्यंतचे काम तुम्हाला माहिती आहेच. हे काम तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवा. जो प्रचार करेगा उसका भला, ना करेगा उसका भी भला..’ भाऊंच्या संवादफेकीला वकिलांकडून टाळ्यांची दाद मिळते.. मग सर्वाची भेट घेत भाऊ पुढे निघतात. वकिलांच्या गाठी-भेटी सुरू असताना कधी फिर्यादी म्हणून, तर कधी आरोपी म्हणून शिवाजीनगर न्यायालयात काही वेळा आल्याची आठवण भाऊंनी सांगितली.   माझ्याबरोबर सकाळी प्रभातफेरीला अनेक वकीलमित्र असतात, असे सांगत त्यांनी त्यांची नावेही घेतली. उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात आणण्याबाबत राज्य सरकारने शिफारस केल्याचेही त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले. आपल्या छोटेखानी भाषणात अनेक किस्से सांगत भाऊ पुढे निघतात.

त्यापूर्वी सकाळी पावणेदहा वाजता गिरीशभाऊंच्या प्रचाराला सुरुवात झाली. पुण्याची ताकद गिरीश बापट, में भी चौकीदार, मोदी.मोदी अशा घोषणा देत बालेवाडी, पाषाण, बाणेर, बावधन भागात त्यांची प्रचारफेरी निघाली. जीपमध्ये उभे असलेले गिरीशभाऊ मतदारांना हात उंचावून अभिवादन करत होते. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले जात होते.

प्रचारफेरी आटोपून दुपारी दोन वाजता मुकुंदनगर येथील थ्रीडी सभागृहात आयोजित व्यापारी मेळाव्यात भाऊंचे आगमन झाले. तेथे रेल्वेमंत्री पीयूष गोयल प्रचारासाठी आले होते. व्यासपीठावर येताच गोयल यांनी भाऊंना मिठी मारून त्यांचे स्वागत केले. भाऊंना पुढे प्रचारासाठी जायचे असल्याने ते लगेचच भाषणासाठी उभे राहतात. भाषणात पीयूष गोयल यांचे वडील, अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देत पीयूषजींचे बोट धरून मलाही देशाच्या राजकारणात जायची संधी मिळाल्याचे ते म्हणाले.

मेळावा आटोपून भाऊ निघताच काही जण त्यांना जेवणाचा आग्रह करत होते. मात्र, त्यांनी घडय़ाळाकडे हात दाखवला आणि नम्र नकार देत कार्यकर्त्यांकडे बोट दाखवत त्यांनी कार्यकर्त्यांना जेवण करून घ्या, असे सांगितले आणि मोजक्या कार्यकर्त्यांसह भाऊ पुढच्या कार्यक्रमाकडे रवाना झाले.

सकाळी प्रचारफेरी, नंतर गाठीभेटी घेत व्यापारी मेळावा, नंतर न्यायालयात गाठीभेटी, सायंकाळी मॉडर्न महाविद्यालयातील कार्यक्रम, खडकी आणि औंध भागात प्रचारफेरी असे एकापाठोपाठ एक कार्यक्रम सुरू होते. रात्री उशिरा जेवण घेतल्यानंतर भाऊंनी शहर भाजपचे कार्यालय असलेल्या सन्मान हॉटेल येथे शुक्रवारच्या प्रचाराच्या रणनीतीवर शेवटचा हात फिरवला.

..तर फत्तेचंद रांका यांच्याशी कट्टी केली असती

व्यापारी मेळाव्याला उपस्थित राहण्याआधी सकाळी मी फत्तेचंद रांका यांना दूरध्वनी केला. तुम्हाला मेळाव्याला यायचे आहे, अन्यथा तुमच्यासोबत मी कट्टी करेन, असे मी त्यांना म्हणालो असे गिरीश बापट यांनी सांगताच सभागृह हास्यात बुडाले. फत्तेचंद मागे बसले आहेत, त्यांना पुढे बोलावून मला त्यांची पंचायत करायची नाही. ते नेहमी मागे राहूनच योग्य कामे करतात, अशी बापट यांनी कोपरखळी मारली.

मोदींना सांगितले, पुण्यात भाजपला फील गुड

पीयूष गोयल, गिरीश बापट यांचे आगमन होण्याआधी महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले भाषणासाठी उभे राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक काळात प्रचारासाठी देशभर फिरतात, मुक्कामाला मात्र दिल्लीतच जातात. पुणे मोदींचे आवडते शहर असल्याने अकलूज येथे सभा घेण्याआधी त्यांनी पुण्यात मुक्काम केला. मोदी यांच्या दौऱ्यात शहर भाजपचे पदाधिकारी त्यांना भेटायला गेले होते. मोदींनी पुण्यात काय वातावरण आहे,असे विचारताच आम्ही भाजपसाठी ‘फील गुड’असल्याचे सांगितले. आता हे खरे करून दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे, असे आवाहनही भिमाले यांनी उपस्थितांना केले.

भाजपच्या मेळाव्यात पंजाचा घोष

मुकुंदनगर येथील व्यापारी मेळाव्यात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधताना गिरीश बापट यांना तुम्ही निवडून देणारच आहात. फक्त मताधिक्य कितीचे देणार सांगा?, असा सवाल उपस्थितांना केला. त्यावर उपस्थितांमधील काहींनी पंजा, पंजा असा घोष केला. त्यावर गोयलही अवाक झाले. मात्र, त्यानंतर पंजा म्हणजे पाच लाखांचे मताधिक्य देऊ, असे सांगताच सभागृहात हशा पिकला.