अरे आवाज कुणाचा….निवडणुका आल्या की हातात पक्षाचे झेंडे घेऊन रस्त्यावर घोषणाबाजी करत प्रचार करणारे कार्यकर्ते हमखास दिसतात. पण यंदाच्या निवडणुकीच चित्र वेगळं आहे. प्रचारसाहित्य विकत घेण्यासाठी नेहमी खचाखच गर्दी असणारी लालबागमधील दुकानं ओस पडलेली दिसत आहेत. प्रचारसाहित्य विक्रीत जवळपास 60 ते 70 टक्के घट झाली आहे. महायुती आणि आघाडीचा उशिरा झालेला निर्णय, सोबतच सोशल मीडिया आणि जीएसटीमुळे विक्रीत घट झाल्याचं येथील दुकानदार सांगतात

यावेळी प्रचारसाहित्याची मागणी अगदी नाहीच्या बरोबर आहे. अजिबातच ग्राहक नाही आहे. मुंबईत फक्त सहा जागा आणि त्यातच युती आणि आघाडी झाल्याने उमेदवार कमी झाले असून पक्षच त्यांना प्रचारसाहित्य पुरवत असल्याचं लालबागमधील पारेख ब्रदर्स दुकानाचे मालक योगेश पारेख सांगतात. योगेश पारेख गेल्या 16 ते 17 वर्षांपासून लालबागमध्ये व्यवसाय करत असून आधी निवडणुकीदरम्यान ज्याप्रकारे रस्ते झेंड्यांनी भरलेले दिसायचे तसं आता दिसत नाही. आता चित्र पुर्ण बदललं असल्याचं ते सांगतात. आधीचा काळ वेगळा होता. त्यावेळी बॅनर लागायचे, झेंडे लागायचे, लाऊडस्पीकर फिरवायचे पण यावेळी तसं काहीच दिसत नाही असं त्यांनी सांगितलं आहे.

उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रचार करतात त्यामुळे दुकानात येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे असं सांगताना यावेळी प्रचारसाहित्याची मागणी अगदीच कमी झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली. 2014 मध्ये लाट असल्याने थोड्या प्रमाणात ग्राहक होता, पण यावेळी अजिबातच नाही अशी माहिती त्यांनी दिली. आता उमेदवार फेसबुक, युट्यूबवर व्हिडीओ अपलोड करुन मतदारांपर्यंत पोहोचतात असं त्यांनी म्हटलं आहे.

मधुबन क्रिएशनचे मालक योगेश पवार यांनीही मागणीचं प्रमाण कमी झालं असून सोशल मीडियामुळे बाजारावर परिणाम झाला आहे असं सांगितलं. मालाची मागणी जवळपास 60 ते 70 टक्क्यांनी कमी झाली असल्याचं ते सांगतात. योगेश पवार मुळचे पुण्याचे असून प्रचारसाहित्याची विक्री करण्यासाठी लालबागमध्ये आले आहेत. पण त्यांना अपेक्षा नव्हती त्यापेक्षाही कमी व्यवसाय झाला आहे. गेल्या 20 वर्षांपासून योगेश पवार हा व्यवसाय करत असून पुण्यात आमचं दुकान असल्याचं सांगतात. लालबागमध्ये व्यवसाय सुरु केला, पण हवा तसा व्यवसाय होत नाही. जीएसटी आणि सोशल मीडियामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याचं त्यांनी सांगितलं.

आचारसंहिता कठोर झाल्याने झेंडे लावण्याचं प्रमाण कमी झालं असून त्यांची मागणी कमी झाली आहे पण उन्हाळा असल्याने टोप्या आणि स्कार्फची मागणी आहे. सोबतच युतीचा निर्णय उशिरा झाल्याने नेमक्या कोणत्या उमेदवाराचा फोटो टी-शर्टवर छापावा याचा निर्णय होण्यास उशीर झाला. टी-शर्ट छापण्यास किमान एक महिन्याचा वेळ लागतो यामुळे त्याची मागणीही कमी झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली.

आता हाच माल पुढील निवडणुकीपर्यंत स्टॉक करुन ठेवण्यात येईल. यादरम्यान पक्षातील नेते, कार्यकर्त्यांचे वाढदिवस असताना आणि काही रॅलींदरम्यान हा माल थोड्या प्रमाणात विकला जाईल असं त्यांनी सांगितलं.