मंगेश राऊत, गडचिरोली

नक्षलवादी कारवाया व निवडणूक पथकाच्या सुरक्षेच्या कारणामुळे गडचिरोली जिल्ह्य़ातील चार केंद्रांवर मतदान रद्द करण्याची नामुष्की गडचिरोली जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे. या मतदान केंद्रांवर नव्याने केव्हा निवडणूक घेण्यात येईल, हे अद्याप स्पष्ट नाही.

माओवाद्यांनी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करीत गडचिरोली जिल्ह्य़ातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा, पुरसलगोंदा आणि वाघेझरी येथे भूसुरुंग व आयडी स्फोट घडवले. यात गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफचे अनेक जवान जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशा परिस्थितीत अतिशय दुर्गम भागातील काही मतदान केंद्रांवर निवडणूक पथक पाठवणे धोक्याचे होते. त्यामुळे निवडणूक पथकांना त्या-त्या परिसरातील पोलीस ठाणे व मदत केंद्रांवर थांबवून ठेवण्यात आले. यात चार मतदान केंद्रांचा समावेश आहे. गट्टा येथे आयडी स्फोट झाल्यानंतर पाच किमी अंतरावर असलेल्या वटेली येथील मतदान रद्द झाल्याचे वृत्त लोकसत्ताने आधीच प्रसिद्ध केले आहे. त्याशिवाय एटापलीपासून ९५ किमी अंतरावर छत्तीसगडच्या सीमेवरील वांगेतुरी, भुस्कोटी आणि भामरागड परिसरातील गर्देवाडा या मतदान केंद्रांवरही मतदान पथक पोहोचू शकले नाही. त्यामुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव तेथील मतदान रद्द केले.

यासंदर्भात गडचिरोलीचे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या मतदान केंद्रांवरील निवडणूक रद्द झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या मतदान केंद्रांवर नव्याने मतदान प्रक्रिया राबवण्यासंदर्भात अद्याप भारतीय निवडणूक आयोगाकडून आदेश प्राप्त झाले नाहीत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

८० टक्के पथक सुरक्षित परतले

गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी, गडचिरोली व अहेरी या तीन विधानसभा क्षेत्रात अनुक्रमे २९०, ३२८ आणि २८६ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी ८० टक्के केंद्रांवरील निवडणूक पथक गडचिरोलीतील ‘स्ट्राँगरूम’मध्ये परतले आहेत. याशिवाय संवेदनशील भागातील २० टक्के मतदान केंद्रांवर असलेल्या पोलीस पथकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले असून हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना लवकरच गडचिरोलीत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

जीव धोक्यात घालून निवडणूक यशस्वी

गडचिरोली जिल्ह्य़ातील अनेक मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा व निवडणूक पथकांना जीवाचा धोका असतो. अशा परिस्थितीतही पोलीस, राज्य सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावून निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबवली. जांभिया-गट्टा मार्गातील टिटोळा परिसरातील चार ठिकाणी पेरून ठेवलेले भूसुरुंग पोलिसांनी उद्ध्वस्त केले. यात सुरक्षा यंत्रणा कुठेही कमी पडलेल्या नाहीत.

– शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, गडचिरोली.