क्रिकेटच्या पिचवरुन निवृत्त झाल्यावर राजकारणाच्या पिचवर आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज असलेले भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार गौतम गंभीर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गौतम गंभीर यांच्या विरोधात दोन वेळा मतदान यादीत नाव असल्याच्या मुद्द्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांनतर त्यांच्यावर परवानगी न घेता प्रचारसभेचे आयोजन केल्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

पूर्व दिल्लीमधून गंभीरने शुक्रवारी कोणतीही परवानगी न घेता प्रचारसभा घेतली. या विरोधात निवडणूक आयोगाकडे इतर पक्षांकडून तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे आयोगाने याबाबत गंभीर दखल घेत दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांना गंभीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

याआधी गौतम गंभीर यांचे नाव मतदार यादीत दोन ठिकाणी असल्याच्या आरोप करत त्यांच्याविरोधात ‘आप’ने दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यावर १ मे रोजी सुनावणी करण्यात येणार आहे.

गौतम गंभीर यांच्याजवळ राजेंद्र नगर आणि करोल बाग अशा दोन मतदान केंद्रातील ओळखपत्र आहेत, असा आरोप पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील ‘आप’च्या उमेदवार आतिशी यांनी केला आहे. ”आम्ही या प्रकरणी गौतम गंभीर यांच्याविरोधात तीस हजारी न्यायालयात तक्रार केली आहे. या प्रकरणी त्यांना एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते”, असेही यावेळी बोलताना आतिशी यांनी म्हटले.