निवडणूक आयोगाने भाजपचे उमेदवार सनी देओल यांना आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबाबत नोटीस जारी केली आहे. सनी देओल यांनी पठाणकोट येथे जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतरच्या काळात सभा घेतली असा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यात ध्वनिवर्धकांचाही वापर करण्यात आला. एकूण दोनशे लोक या सभेस उपस्थित होते. शांतता काळात प्रचार सभा घेणे हा आचारसंहितेचा भंग असून मतदानाच्या ४८ तास अगोदर प्रचार बंद करायचा असतो. रविवारी पंजाबमधील १३ लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. देओल हे गुरूदासपूर मतदारसंघात काँग्रेसचे सुनील जाखड यांच्या विरोधात लढत देत आहेत.

फेसबुकवर फॅन्स ऑफ सनी देओल हे पान सुरू केल्यानंतर त्याचा खर्च भाजपचे गुरूदासपूर येथील उमेदवार असलेल्या सनी देओल यांच्या नावावर निवडणूक खर्च म्हणून लावण्यात आला आहे. देओल यांच्या निवडणूक खर्चात या पानाचे १७४६४४ रुपये धरण्यात आले आहेत.

काँग्रेसने ६ मे रोजी याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी एस. करुणा राजू यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर गुरुदासपूर येथील माध्यम प्रमाणन व निरीक्षण संस्थेने याबाबत चौकशी केली. ‘फॅन्स ऑफ सनी देओल’ या पानाच्या अ‍ॅडमिन व भाजप उमेदवार सनी देओल यांना नोटीस देऊन स्पष्टीकरण मागवण्यात आले होते, पण त्यांनी वेळेत उत्तर दिले नाही.

तक्रारदार हिमांशु पाठक हे काँग्रेसचे पदाधिकारी असून त्यांनी सांगितले,की देओल यांनी उत्तर न दिल्याने त्यांच्यावर कारवाई झाली आहे. फेसबुकवर ३० एप्रिल रोजी हे पान सुरू करून त्यावर मोठा खर्च करण्यात आला होता.