मतदान सुरू झाल्यानंतर आधी पाच व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात यावी तसंच फेरफार आढळल्यास त्या विधानसभा मतदारसंघातील सर्व व्हीव्हीपॅटची मोजणी व्हावी ही विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने बुधवारी फेटाळून लावली. जिथे शक्य आहे त्या मतदान केंद्रांवर ईव्हीएमच्या आधी व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी व्हावी अशी मागणी २२ विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने केली होती. गुरुवारी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची पडताळणी करावी असं त्यांनी मागणीत म्हटलं होतं. पण निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली.

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आयोगाकडे मागणी करताना सांगितलं होतं की, ‘व्हीव्हीपॅटची पडताळणी करताना जर काही विसंगती आढळली तर सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची पडताळणी केली जावी’.

मंगळवारी काँग्रेस नेते आणि वकील अभिषेक सिंघवी यांनी आयोगासमोर विरोधकांची बाजू मांडली होती. विरोधकांनी निवडणूक आयोगाने आमच्या मागण्यांचा विचार करु असं सांगितलं असल्याची माहिती दिली होती. मात्र यावेळी निवडणूक आयोगाची देहबोली सकारात्मक नव्हती असंही विरोधकांनी म्हटलं होतं. भाजपाने मात्र विरोधक पराभवाच्या भीतीने हे सर्व करत असल्याचा टोला लगावला होता.