आचारसंहिता लागू असताना ‘मिशन शक्ती’ची माहिती भाषणातून दिल्याबद्दल आक्षेप

नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक अवघ्या चौदा दिवसांवर आली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशाला उद्देशून केलेले भाषण अपेक्षेप्रमाणे राजकीय वादात अडकले. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर देशवासीयांना ‘माहिती’ देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले असून त्यांच्या या ‘राजकीय कृती’वर विरोधकांनी प्रखर टीका केली आहे. देशाच्या सुरक्षेशी निगडित मुद्दा निवडणूक आयोगाच्या कार्यक्षेत्रात येत नसला तरी मोदींच्या भाषणाबाबत निवडणूक आयोग नेमकी कोणती भूमिका घेतो, याकडे आता लक्ष केंद्रित झाले आहे.

भारताने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र बनवण्याची क्षमता सिद्ध केली असून पृथ्वीभोवती फिरणारा (लो ऑरबिट सॅटलाइट) उपग्रह तीन मिनिटांमध्ये उद्ध्वस्त करण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दूरदर्शनवर प्रसारित केलेल्या भाषणाद्वारे दिली. मात्र, या यशाच्या आड मोदींनी राजकीय प्रचाराचा हेतू साध्य करून घेतल्याची टीका विरोधकांनी केली. अंतराळ विषयक यशाची माहिती पंरपरेप्रमाणे संरक्षण संशोधन आणि विकास विभाग (डीआरडीओ) व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील (इस्रो) शास्त्रज्ञाकडून दिले जाते. असे असताना ‘मिशन शक्ती’ची माहिती देण्यासाठी पंतप्रधानांनी देशाला उद्देशून भाषण करण्याची गरजच नव्हती, असा आक्षेप घेणारे पत्र मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी घेतला. निवडणूक आयोगाला पाठवले आहे. पंतप्रधान मोदी हे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आहेत. निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना पंतप्रधानांनी भाषण करणे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचेही येचुरी यांनी नमूद केले आहे.

‘मिशनशक्ती’चे श्रेय मोदी स्वतकडे घेत असल्याची टीका करत काँग्रेस (यूपीए) सरकारच्या काळातच ‘मिशनशक्ती’ची क्षमता भारताने प्राप्त केल्याचा दावा काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी ट्वीटद्वारे केला. यूपीए सरकारच्या काळात सुरू झालेला उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र निर्माण करण्याचा प्रकल्प आज यशस्वी झाला असून त्याबद्दल शास्त्रज्ञांने तसेच, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे अभिनंदन!.. असे पटेल यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे. सपचे प्रमुख अखिलेश यादव, बसपच्या सर्वेसर्वा मायावती तसेच, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही मोदींवर टीका केली आहे. मोदींनी आचरसंहितेचा भंग केला असून त्यांनी फुकटात टीव्हीचा वापर करून घेतला.  देशवासीयांचे लक्ष खऱ्या समस्यांवरून दुसरीकडे वळवण्याचाच प्रयत्न केल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

हा निवडणूक स्टंट नव्हे- जेटली

विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपला अखेर ‘संकटमोचक’ नेते अरुण जेटली यांनाच पाचारण करावे लागले. विरोधकांनी ‘कारकुनी आक्षेप’ घेऊ नयेत. ‘मिशनशक्ती’ ही मोहीम देशाच्या संरक्षणाशी निगडित असल्यामुळे त्याकडे एनडीए सरकारचा ‘निवडणूक स्टंट’ म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही, असे जेटली बुधवारी पत्रकार परिषदेत म्हणाले. एप्रिल २०१२ मध्ये यूपीए सरकारच्या काळात ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्रची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. ‘डीआरडीओ’चे तत्कालीन अध्यक्ष व्ही. के. सारस्वत यांनी भारताकडे उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र निर्माण करण्याची क्षमता असल्याचे म्हटले होते. मात्र, केंद्र सरकारने हे क्षेपणास्त्र विकसित करण्याची परवानगी दिली नव्हती, असे सारस्वत यांनी स्पष्ट केले होते, असे सांगत जेटली यांनी ‘मिशनशक्ती’चे श्रेय मोदी सरकारलाच असल्याचा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेवर जेटली म्हणाले की, ‘ते (विरोधक) जेवढे खालच्या स्तरावर जातील तितके आम्ही (भाजप) अधिक बळकट होऊ’!