|| प्रसाद रावकर

उच्चभ्रू, मध्यमवर्गीय, चाळकरी ते झोपडपट्टीवासीय अशी संमिश्र वस्ती असलेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदाही शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्यात लढत होत आहे. या वेळी हा मतदारसंघ कायम राखण्यासाठी शिवसेनेला लढत द्यावी लागत आहे.

कुलाबा, कफ परेड ते वरळी, शिवडीच्या वेशीपर्यंत पसरलेला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी अस्सल मराठमोळा परिसर म्हणून विभाग ओळखला जात होता. आता हा मतदारसंघ बहुमिश्रित झाला. दक्षिण मुंबईतून मराठी भाषक कमी झाला आणि अमराठी मतदारांची संख्या वाढत गेली.

मराठी भाषक, मुस्लीम, जैन आणि अन्य अमराठी मतदार या मतदारसंघात वास्तव्यास आहेत. या मतदारसंघातील चिराबाजार, गिरगाव, ग्रॅन्टरोड, ताडदेव, कुंभारवाडा, खेतवाडी, शिवडी, वरळी ही शिवसेनेची बलस्थाने. मात्र असे असले तरी काँग्रेसने अमराठी मतदारांच्या भरवशावर लोकसभा निवडणुकीत हा गड आपल्याकडे राखण्यात यश मिळविले होते. मागील निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव या मतदारसंघात दिसत होता.  पण आता परिस्थिती निराळी आहे. नोटाबंदी, वस्तू आणि सेवा करामुळे नाके मुरडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. असे असले तरी केंद्रात भाजप सरकार पुन्हा सत्तेवर यावे असे मत व्यक्त करणाऱ्यांची संख्याही तितकीच आहे.

या पाश्र्वभूमीवर मिलिंद देवरा यांनी झोपडपट्टय़ा, चाळी, उच्चभ्रू वस्त्यांमध्ये जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचा सपाटा लावला आहे. मात्र गेली पाच वर्षे मतदारसंघात ते कुठेच दिसले नाहीत, असा त्यांच्याबद्दल आक्षेप घेतला जातो. तर गेल्या पाच वर्षांत आपण केलेल्या कामांचा दाखला देत अरविंद सावंत मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.

मतदारसंघातील बलाबल

कुलाब्यापासून शिवडीपर्यंत एकूण ३६ नगरसेवक असून त्यात शिवसेनेचे १८, भाजपचे १०, काँग्रेसचे ६, अखिल भारतीय सेना आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येकी एक असे बलाबल आहे. शिवसेना आणि भाजपचे मिळून २८ नगरसेवक या लोकसभा मतदारसंघात आहेत. मुस्लीम, जैन समाजाची मते आपल्याकडे खेचून आणण्याची स्पर्धा उमेदवारांमध्ये लागली आहेत. अमराठी मतदारांना आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होणाऱ्या उमेदवाराचा विजय पक्का आहे. देवरा यांना उद्योगपती मुकेश अंबानी व उदय कोटक यांनी पाठिंबा जाहीर केल्याने वेगळा संदेश गेला आहे. देवरा हे व्यापार आणि उद्योगांना अनुकूल भूमिका घेतील, असे या उद्योगपतींनी चित्रफितीत म्हटले असून, त्याचा गुजराती, मारवाडी, जैन मतदारांमध्ये वेगळा संदेश जाऊ शकतो. याशिवाय झोपडपट्टीवासीयांना ५०० चौरस फुटाचे घर देण्याच्या राहुल गांधी यांच्या आश्वासनाचा झोपडपट्टय़ांमध्ये लाभ उठविण्याचा देवरा यांचा प्रयत्न आहे.

अरविंद सावंत

बलस्थान

  • शिवसेनेचे संघटनात्मक जाळे, युतीमुळे लाभ, मोदींची प्रतिमा
  • मतदारसंघात संपर्क चांगला
  • संसदेत प्रभावी कामगिरी

कच्चे दुवे

  • नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कररचनेमुळे व्यापारी वर्गातील नाराजी
  • चाळींचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन प्रत्यक्षात येऊ शकले नाही

 

मिलिंद देवरा

बलस्थान

  • व्यापारी आणि उद्योग जगतातील भाजप सरकारच्या विरोधातील नाराजी
  • वडिलांची पुण्याई
  • अमराठी भाषकांचे मतदारसंघातील चांगले संख्याबळ

कच्चे दुवे

  • पाच वर्षे मतदारसंघात संपर्कात नसणे
  • काँग्रेसमधील गटबाजी
  • दहा वर्षे खासदार असताना प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश