|| दयानंद लिपारे

कोल्हापुरातील विरोध मावळात मावळला

राजकारणाच्या सारीपाटावर कोण कोणाच्या गळ्यात पडेल आणि कोण कोणाची कधी साथ सोडेल याचा अंदाज यायचा नाही. कोल्हापूर लोकसभेच्या आखाडय़ात खासदार धनंजय महाडिक यांना व्यक्तिनिष्ठ स्वरूपात विरोध करून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी प्रचाराचा बाण हाती घेतला होता. त्यावरून आमदार पाटील आणि राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्यात वाक्युद्धही रंगले होते. आता हेच पवार-पाटील मावळ लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गळ्यात गळा घालत आहेत.

सतेज पाटील यांचे पुतणे आणि कोल्हापुरातील विधानसभेचे संभाव्य उमेदवार ऋतुराज पाटील यांनी पार्थ पवार या मित्राच्या प्रचाराची धुरा वाहायला सुरुवात केली असून हा प्रचार म्हणजे पवार-पाटील कुटुंबातील नातेबंध सुधारण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत नवे समीकरण निर्णायक ठरले आहे. भाजप-शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठबळ देताना सतेज पाटील यांनी महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. ‘आमचं ठरलंय’ असे घोषवाक्य बनवून त्यांनी प्रचाराचा बाण सोडला होता. सतेज पाटील यांची भूमिका बदलत नसल्याने शरद पवार यांनी ‘मी बी ध्यानात ठेवलंय’ असे म्हणून इशारा दिला होता. हे विधान सतेज पाटील यांना भविष्यात अडचणीचे ठरणार असा कयास व्यक्त केला जात होता.

कोल्हापुरातील मतदान संपल्यानंतर आता पवार-पाटील कुटुंबातील राजकारण नवा रंग धारण करीत आहे. त्याला उभय कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे नातेबंध कारणीभूत ठरताना दिसत आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ हे मावळ मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. यातून पवार-पाटील कुटुंबातील तिसरी पिढी अधिक जवळ आली आहे.

पार्थ-रोहित पवार आणि ऋतुराज पाटील यांच्यासह काही निवडक मित्रांचा एक गट आहे. मुंबईत महाविद्यालयीन शिक्षणासाठी एकत्र आलेले हे मित्र अजूनही मैत्री टिकवून आहेत. दोन महिन्यांपूर्वी ऋतुराज यांच्या विवाह समारंभाला पार्थ-रोहित बंधू दोन दिवस कोल्हापुरात मुक्कामाला होते. आता पार्थ यांच्या प्रचारासाठी ऋतुराज पिंपरी-चिंचवड परिसरात आहेत. या भागात डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संकुल महाविद्यलयात १५ हजार विद्यार्थी, २ हजार प्राध्यापक-कर्मचारी वर्ग आहे. बरेच नातेवाईक आहेत. या सर्वानी पार्थ याना मदत करावी, असे आवाहन डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संकुलाचे विश्वस्त ऋतुराज करीत असून प्रचार संपेपर्यंत त्यांचे संपर्क अभियान सुरू राहणार आहे. यातून शरद पवार-डॉ. डी. वाय. पाटील, अजित पवार-सतेज पाटील आणि त्यांच्यानंतर दोन्ही कुटुंबातील तिसरी पिढी राजकीय बंधात बांधली जाताना दिसत आहे.

कोल्हापुरातील विरोध अन्यायातून

पार्थ पवार यांना मदत करण्यामागे शरद पवार यांचा रोष टाळण्याची चाल आहे, अशी चर्चा आहे. या प्रश्नावर ऋतुराज पाटील यांनी सांगितले, की विधान परिषद निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी विरोध केल्याने काकांना (सतेज पाटील) मोठी किंमत चुकवावी लागली. यश मिळाले असले तरी फसवणुकीचे शल्य कार्यकर्तेही बोलून दाखवत होते. त्यातून लोकसभेला ‘महाडिक गटा’च्या विरोधात भूमिका घेतली असली, तरी ‘राष्ट्रवादी’ला आमचा विरोध नव्हता. पार्थ हे मित्र असल्याने प्रचार करीत आहे. पवार-पाटील कुटुंबाबातील कटुता सुधारावी असा काही प्रकार नाही, उलट दोन्ही कुटुंबाबातील नाते आणि मैत्र तिसऱ्या पिढीतही अधिक घट्ट होत आहे, असा दावा ऋतुराज पाटील यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. दरम्यान, कोल्हापुरात महाआघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना आघाडीधर्माची जाणीव झाली असून ते आज मुंबईत आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.