विविध तंत्रांचा प्रचारात वापर आणि राम मंदिरांना भेटी

मुंबई-ठाणे परिसरातील प्रचाराने आता वेग घेतला असून शनिवार-रविवार या सुट्टय़ांच्या दिवशी मतदारसंघ पिंजून काढण्यात येत आहेत. पारंपरिक प्रचारफेऱ्यांबरोबरच निवासी सोसायटय़ांमध्ये बैठका, ट्विटरच्या माध्यमातून लाइव्ह चॅट, विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी चर्चा, रेल्वे प्रवाशांशी संवाद, मॉर्निग वॉक, योगवर्ग व हास्य क्लबमध्ये हजेरी अशा वेगवेगळ्या तंत्रांबरोबरच रामनवमीच्या निमित्ताने श्रीरामदर्शन व पालखी सोहळ्यातही उमेदवार सहभागी झाले.

उत्तरमध्य मुंबईतील भाजप खासदार पूनम महाजन यांनी प्रथम मतदार, महिला यांच्यावर लक्ष केंद्रित करताना लाइव्ह चॅटच्या माध्यमातून शनिवारी तरुणांशी संवाद साधला, तर ‘भविष्य आपलेच आहे’ (फ्यूचर इज अस) या उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत चांगली कामगिरी करीत असलेल्या महिलांशी चर्चा केली. काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त यांनी कुर्ला, वांद्रे परिसरातील मुस्लीम वस्त्या, वांद्रे व अन्य परिसरांतील ख्रिश्चन मतदार यांच्याबरोबरच मराठी मतदारांवरही लक्ष केंद्रित केले आहे. मोदी सरकारने केवळ आश्वासने दिली आणि केंद्र व राज्य सरकारने जनतेसाठी काहीही काम केलेले नाही, याबरोबरच मतदारसंघातही विमानतळ परिसरातील झोपडपट्टीवासीय, शासकीय लीज जमिनींवरील रहिवासी व अन्य रहिवाशांचे प्रश्न सुटले नाहीत, या मुद्दय़ांवर प्रचार सुरू केला आहे.

उत्तरपश्चिम मतदारसंघातील शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी अंधेरी (प) येथील टाटा कंपाऊंड, डीएन नगर, गोरेगाव क्षेत्रात बामणवाडी, आरे रोड परिसरातून रथफेरीद्वारे मतदारांशी संवाद साधला. वर्सोवा क्षेत्रातही विरा देसाई मार्ग, िलक रोड, आझादनगरमध्ये काढलेल्या प्रचारफेरीत भाजप आमदार अमित साटम, भारती लवेकर, यशोधर फणसे आदी सहभागी झाले होते. मुंबईतील काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांनी जोगेश्वरी पूर्वमध्ये राम मंदिरापासून ते हरीनगपर्यंत व अंधेरी पूर्व विभागात रेल्वेस्थानकापासून ते मालपा डोंगरीपर्यंत पदयात्रा काढली. त्यात माजी आमदार सुरेश शेट्टी, काँग्रेस नेते राजेश शर्मा आदी सहभागी झाले होते.

ईशान्य मुंबईतील भाजप उमेदवार मनोज कोटक यांनी भांडुप येथील शहीद जयवंत पाटील उद्यानात मॉर्निग वॉकला आलेल्यांशी संपर्क साधला. हास्य क्लब, योग वर्ग झाल्यानंतरही ते संबंधितांशी संवाद साधत आहेत. कांजूरमार्ग रेल्वेस्थानकावर जाऊन कोटक यांनी पाहणी केली आणि रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. मतदारसंघातील राम मंदिरांमध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतले.

दक्षिण मध्य मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी कार्यकर्त्यांबरोबर पदयात्रा आणि प्रचारफेऱ्या काढून मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. शीव, चिता कँप, धारावी, माहीम, वडाळा परिसरांत त्यांनी प्रचारफेऱ्या काढल्या. पालघरमधील शिवसेना उमेदवार राजेंद्र गावीत यांनी सफाळे येथील राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले व उत्सवात सहभागी झाले. शनिवारी-रविवारी सुट्टय़ांच्या दिवशी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर आणि शनिवारी रामनवमी व रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवांमध्ये सहभागी होऊन सर्वाशी संवाद साधण्यावर उमेदवारांचा भर आहे.

मानखुर्दमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शनिवारी सायंकाळी मानखुर्दच्या मोहिते-पाटील नगर येथे मानापमानावरून भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होते. त्या कार्यक्रमात स्थानिक रहिवासी आणि भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटोळे यांचे नाव पुकारण्यात आले नाही. त्यामुळे पाटोळे यांच्या कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष हेमंत भास्कर यांना  जाब विचारला. पुढे हा वाद वाढला आणि हाणामारी झाली. त्यात भास्कर जखमी झाले. कोटक आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत अखेर हा वाद मिटवला, असे पाटोळे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.  या प्रकाराबाबत कुणीही तक्रार केलेली नाही.  तक्रार आल्यास कारवाई करण्याच्या सूचना मानखुर्द पोलिसांना दिल्या आहेत, असे उपायुक्त शशी मीना यांनी सांगितले.