देशातील अन्य लोकसभा मतदारसंघांप्रमाणेच उद्या (२३ मे) येथे होणाऱ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये व्ही व्ही पॅट पडताळणीचा समावेश असल्यामुळे निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब लागणार आहे.

येथील एमआयडीसीच्या परिसरात असलेल्या फूड उद्या सकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या या मतमोजणीच्या प्रक्रियेबद्दल माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले की, प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय चौदा टेबलांवर मतदान यंत्रे घेऊन मतमोजणी केली जाणार आहे.

या विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेले मतदान लक्षात घेता, मतमोजणीच्या किमान २० ते कमाल २५ फेऱ्या होणार आहेत. ही मोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच व्हीव्हीपॅटची पडताळणी केली जाणार आहे. मतदारांनी दिलेले मत त्यांना अभिप्रेत असलेल्याच उमेदवाराला गेले आहे ना, याची खातरजमा करण्यासाठी या निवडणुकीत प्रथमच ही पद्धत अवलंबिली जात आहे.

मोजणीसाठी ४१० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पोस्टल बॅलेटचे ४ हजार ३९ मतदान असून ६१७ सनिक मतदार आहेत. मतमोजणी बिनचूक पार पडण्यासाठी आत्तापर्यंत दोन प्रशिक्षणे झाली असून तिसरे प्रशिक्षण प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी होणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, सुविधा अ‍ॅपद्वारे मोजणीची माहिती प्रत्येक फेरीनंतर दिली जाणार आहे. कुडाळ या सर्वात लहान मतदारसंघाच्या मतमोजणीच्या २०, तर रत्नागिरी मतदारसंघाच्या २५ फेऱ्या होतील.

मतमोजणीच्या ठिकाणी दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वार (गेट क्र. १) मतमोजणी अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवारांना प्रवेश दिला जाईल. अधिकृत प्रवेशिकाधारक व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

मोबाइल, हत्यारे, कॅलक्युलेटर किंवा इतर कोणत्याही आक्षेपार्ह वस्तू आतमध्ये नेता येणार नाहीत.

मतमोजणीसाठी व्यवस्था केलेल्या ठिकाणी  त्रिस्तरीय सुरक्षा पथक नेमले असून दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, दोन उपअधीक्षक, ११ पोलिस निरीक्षक, ३४ उपनिरीक्षक, ४१० कर्मचारी, पोलिसांच्या एसआरपीएफ आणि सीआरपीएफच्या प्रत्येकी एक प्लाटून या ठिकाणी नियुक्त केल्या आहेत, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी नमूद केले.