एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असा अंदाज वर्तवण्यात आला असून यानंतर विरोधकांनी एक्झिट पोलचे अंदाज चुकतील असा दावा केला आहे. दुसरीकडे अॅक्सिस My India च्या एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडियावर युजर्सनी अॅक्सिस My India च्या एक्झिट पोलमधील चूक निदर्शनास आणून दिली आहे.

नेमके काय चुकले ?

एक्झिट पोलमध्ये जागानिहाय सर्वाधिक लोकप्रिय पक्ष या भागात उत्तराखंडमधील पाच मतदारसंघाची नावे आहेत. सादुलशहर, गंगानगर, करणपूर, सुरतगढ आणि रायसिंह नगर अशा पाच मतदारसंघांचा समावेश होता. या ठिकाणी भाजपा बाजी मारणार असा अंदाज वर्तवण्यात आला. पण हे पाच मतदारसंघ विधानसभेचे होते आणि त्यांना लोकसभा मतदारसंघ दाखवण्यात आले. उत्तराखंडमध्ये टिहरी गढवाल, अलमोडा, गढवाल, हरिद्वार आणि उधमसिंह नगर असे पाच लोकसभा मतदारसंघ आहेत.

इंडिया टुडे- अॅक्सिस My India च्या पोलमध्ये आणखी चूक म्हणजे चेन्नई मध्य या मतदारसंघात काँग्रेस विजयी होणार असा अंदाज होता. पण या मतदारसंघात काँग्रेस निवडणूक लढवत नाही. या मतदारसंघात डीएमकेचे उमेदवार आहे. या चुका समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एक्झिट पोलबाबत शंका उपस्थित होत आहेत.

कंपनीचे म्हणणे काय?

अॅक्सिस My India या कंपनीने ट्विटरवरुन भूमिका स्पष्ट केली आहे. टायपिंग करताना या चुका झाल्या होत्या, असे कंपनीने म्हटले आहे.

अॅक्सिस इंडियाने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला तरी एकंदरित एक्झिट पोलवरुन यंदा राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाल्याचे दिसते.