राज्यात शिवसेनेबरोबर युती करण्याचा निर्णय भाजपसाठी फायदेशीर ठरणार हाच निष्कर्ष मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तविण्यात आला. भाजप आणि शिवसेना युतीचेच वर्चस्व राहील आणि युती ३४ ते ४० जागा जिंकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच वेळी काँग्रेसची पीछेहाट होऊन राष्ट्रवादी जास्त जागा जिंकेल, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यातील ४८ पैकी ३० पेक्षा जास्त जागा भाजप-शिवसेना युती जिंकेल, असा निष्कर्ष सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमधून काढण्यात आला आहे. चार वर्षे शिवसेनेने सतत कुरघोडी केली किंवा नेतृत्वाच्या विरोधात टीका केली. तरीही ते सारे सहन करून शिवसेनेबरोबर युती करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय भाजपसाठी उपयुक्त ठरेल, अशीच चिन्हे आहेत. कारण युती झाली नसती तर उभयतांना फटका बसला असता. ‘एबीपी-नेल्सन’ या संस्थेने युतीला ३४ तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला १४ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे. ‘सी-व्होटर’ने ही युतीला ३४ तर आघाडीला १४ जागा मिळतील, असाज अंदाज व्यक्त केला आहे. ‘टाईम्स नाऊ’ने युतीला ३८ तर आघाडीला १० जागा, ‘इंडिया टुडे’ने युतीला ४० आणि आघाडीला ८ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे.  भाजप-शिवसेना युतीत भाजप आणि शिवसेनेच्या संख्याबळात जास्त फरक नसेल, असा अंदाज आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढे असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

वंचितचा फायदा भाजपला ?

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने केलेल्या मतविभाजानचा फायदा भाजप आणि शिवसेना युतीला झाला असण्याची शक्यता वर्तविली जाते. आंबेडकर यांच्या आघाडीने दलित आणि मुस्लीमांची मोट बांधली असल्यास तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी मोठा फटका असेल.