मतदानोत्तर चाचण्यांमध्ये ‘एनडीए’ बहुमताच्या जवळ; भाजपच्या जागा घटणार

भाजप आणि काँग्रेसने परस्परांवर उठविलेली राळ, काँग्रेसने मोदी तर भाजपने गांधी कुटुंबियांना केलेले लक्ष्य, भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यातील हिंसक संघर्ष, पुलवामा, बालाकोट आणि राफेलवरून केंद्रीत झालेला प्रचार या पाश्र्वभूमीवर कोण बाजी मारणार याची उत्सुकता असताना मतदानोत्तर चाचण्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा निष्कर्ष सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमध्ये काढण्यात आला.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा कमी होऊन त्या २२० पर्यंत जातील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. लोकसभेच्या सातव्या टप्प्यातील ५९ जागांचे मतदान पार पडल्यावर रविवारी साऱ्या देशाची उत्सुकता शिगेला पोहचलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर करण्यात आले. विविध वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे किंवा संस्थांनी केलेल्या केलेल्या पाहणीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच पुन्हा बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला  आहे.

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी २७५ ते ३००च्या आसपास तर काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला १२५ ते १३० च्या आसपास जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. छोटे पक्ष किंवा इतरांना १००च्या आसपास जागा मिळतील, असा मतदानोत्तर चाचण्यांचा सूर आहे.

विरोधकांनी मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज किंवा निष्कर्ष फेटाळून लावले आहेत. २३ मे रोजी मतमोजणीच्या दिवशीच सारे चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

‘नेता – न्यूज एक्स’या वृत्तवाहिनीने केलेल्या पाहणीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २४२ तर काँग्रेसला १६४ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे. हा एकमेव अपवाद वगळल्यास अन्य संस्थांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत किंवा बहुमताच्या जवळ संख्याबळ मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशच्या निकालाबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे. कारण गेल्या वेळी ८० पैकी भाजपला ७१ तर मित्र पक्षांना दोन जागा मिळाल्या होत्या. ‘टाईस्म नाऊ’या वृत्तवाहिनीने भाजपला ५६ तर समाजवादी पार्टी आणि बसपा महाआघाडीला २० तर काँग्रेसला दोन जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याच वेळी ‘एबीपी-नेल्सन’ने सपा-बसपा महाआघाडीला ५६, भाजपला २२ तर काँग्रेसला दोन जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३० तर संयुक्त पुरोगामी आघाडीला १० जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हिंसाचाराचे गालबोट लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला २८ तर भाजपला ११ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देशमला सत्ता गमवावी लागेल, असा अंदाज काही स्थानिक वृत्तवाहिन्यांनी वर्तविला आहे. वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन यांच्या पक्षाला १७५ पैकी १०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज आहे. ओदिशामध्ये मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दल सत्ता कायम राखेल, असा अंदाज आहे. पण लोकसभेत भाजप बिजू जनता दलापेक्षा जास्त जागाजिंकेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मतदानोत्तर चाचण्यांवर विश्वास ठेऊ नका. अशी आकडेवारी देऊन मतदान यंत्र अदलाबदलीचा हा डाव आहे. त्यामुळे  विरोधकांनी एकजूट ठेवावी. आपण ही लढाई एकत्र लढू.    – ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री.

अंदाज काय?

  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचारात भाजप आणि मोदी यांना लक्ष्य केले होते. तसेच राफेलमधील गैरव्यवहारांवरून मोदी यांच्यावर आरोप झाले होते.
  • भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) मध्ये बरेच अंतर असेल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
  • गेल्या वेळी फक्त ४४ जागा जिंकलेल्या काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.