लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेच निकालाची संभाव्य स्थिती सांगणारे एक्झिट पोल जाहीर झाले. यामध्ये पुन्हा देशात भाजपाप्रणित एनडीए सरकार येईल, असे अंदाज जवळपास सर्वच पोलमधून वर्तवण्यात आले आहेत. मात्र, हे पोल सदोष असल्याचे आणि त्यांनी केलेल्या भाकितांवर आपला कधीही विश्वास नव्हता आणि नाही, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांनी म्हटले आहे.

येचुरी म्हणाले, एक्झिट पोल हे खरे नसतात, त्यामुळे त्यांच्यावर माझा विश्वास नाही. इतकेच नव्हे तर जे देश निवडणूक प्रक्रियांबाबत अधिक अॅडव्हान्स आहेत त्यांच्याही एक्झिट पोलचे अंदाज चुकतात. याचे उदाहरण म्हणजे आपण काल ऑस्ट्रेलियातील परिस्थीती पाहिली यामध्ये प्रत्यक्षात लागलेला निवडणुकांचा निकाल हा पूर्णपणे एक्झिट पोलच्या विरुद्ध होता. मला सध्याच्या काळातील तरुणांना आर. के. लक्ष्मण यांच्या कर्टुनच्या बाबतही आठवण करुन द्यायचीय की, त्यांनी आपल्या कार्टुनमधून भारतात जाहीर झालेल्या पहिल्या एक्झिट पोलवर टीका केली होती. त्यांच्या कार्टुनमध्ये नवरा बायकोला म्हणतो की, ‘मी चुकीच्या उमेदवाराच्या चिन्हासमोर शिक्का मारला. यावर त्याची बायको रागावते त्यानंतर नवरा तिला म्हणतो काळजी करु नको मी एक्झिट पोलमध्ये ही चूक सुधारेल.’ हीच भारतातील एक्झिट पोलची स्थिती असल्याचे येचुरी यांनी म्हटले आहे.

२००४ आणि २०१४ मध्ये आजच्या तुलनेत कमी मतदान झाले होते. मात्र, यंदा मताची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे आता २३ मे रोजीच काय निकाल येतोय हे पाहणे महत्वाचे राहणार आहे. पण, पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या सहा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. याकाळात मतदारांना मतदान करण्यापासून प्रतिबंधही करण्यात आला होता. या भागात सुरक्षा रक्षकही अपुऱ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. जर राज्याच्या पोलिसांनी आपले कर्तव्य व्यवस्थित बजावले असते तर केंद्रीय पोलिसांची गरजच पडली नसती, असेही येचुरी म्हणाले.

निवडणूक आयोगावरही आपण नाराज असल्याचे येचुरी यांनी म्हटले आहे. खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना निवडणूक आयोगाने वारंवार क्लीनचिट दिल्या आहेत. त्यामुळे आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.